न्यायालयाने ठोठावला 1.22 लाख डॉलर्सचा दंड, न्यूयॉर्कच्या न्यायालयात 57 मिनिटे चालली सुनावणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी अटक केल्यानंतर जामिनावर सुटकाही करण्यात आली. याप्रकरणी पुढील सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारी प्रकरणात अटक होणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
एका पोर्नस्टारने ट्रम्प यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत ते दोषी आढळले आहेत. या प्रकरणात शरण येण्यासाठी वकिलांसह न्यायालयात उपस्थित झाले असता त्यांना प्रातिनिधिक अटक करण्यात आली. तसेच सुनावणीअंती मुक्तताही करण्यात आली. याचदरम्यान, त्यांनी आपण कोणताही गुन्हा केल्याचा इन्कार करत सरकारच्या प्रशासकीय धोरणांवर कडक शब्दात टीका केली आहे. तसेच न्यूयॉर्क येथील न्यायालयात उपस्थित राहण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्याला दोषी धरणाऱया न्यायाधीशावरही टीका केली. आपल्याला चुकीच्या पद्धतीने दोषी धरण्यात आल्याचे म्हणणे त्यांनी काही पत्रकारांसमोर व्यक्त केले आहे.
पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या गुन्हय़ाप्रकरणी ट्रम्प यांच्यावर 34 आरोप ठेवण्यात आले आहे. या आरोपांमध्ये 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हे प्रकरण दडपण्यासाठी आर्थिक देवघेव झाल्याचा आरोपही आहे. न्यायालयात हजेरी लावताना ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळत स्वतःला निर्दोष घोषित केले. मात्र, युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ट्रम्प यांना सुमारे 1.22 लाख डॉलर्स दंड भरण्याचे आदेश दिले. दंडाची रक्कम स्टॉर्मी डॅनियल्सला दिली जाईल. सुनावणीनंतर ट्रम्प न्यायालयातून बाहेर पडले. यापूर्वी न्यूयॉर्क न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यास मान्यता दिली होती. याच प्रकरणात ते न्यायालयात हजर राहण्यासाठी आले होते. याप्रसंगी मॅनहॅटन न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक मोठय़ा संख्येने पोहोचले होते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आत आणि बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अमेरिका नरकात जात असल्याची टीका
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ट्रम्प फ्लोरिडामध्ये दाखल झाले. येथे त्यांनी जाहीर निवेदन जारी केले. ‘अमेरिकेत असे काही घडू शकते, असे मला कधीच वाटले नव्हते. निर्भयपणे माझ्या देशाचे रक्षण करणे हा एकमेव गुन्हा मी केला आहे. आपला देश नरकात जात आहे’, अशी टीका त्यांनी केली. हे खोटे प्रकरण केवळ 2024 च्या आगामी निवडणुकीत हस्तक्षेप करण्यासाठी आणण्यात आले असून ते तात्काळ वगळण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.









