गृह मंत्रालयाकडून आदेश जारी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील दिग्गज नेते आणि जेकेएपीचे प्रमुख सैयद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंबंधी आदेश जारी केला आहे. सैयद मोहम्मद अल्ताफ बुखारी यांना गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सीआरपीएफच्या कमांडो जवानांची सुरक्षा प्राप्त होणार आहे. झेड प्लस सुरक्षेच्या अंतर्गत बुखारी यांच्या सुरक्षेकरता एकूण 36 जवान तैनात असणार आहेत.
बुखारी यांच्यावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला असल्याचे समोर आले होते. या कटाची माहिती मिळताच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून यासंबंधीचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविण्यात आला होता. यानंतरच सीआरपीएफची सुरक्षा व्यवसथा पुरविण्याचा निर्देश जारी करण्यात आला.
अल्ताफ बुखारी हे यापूर्वी पीडीपीमध्ये कार्यरत होते. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरचे शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. 8 मार्च 2020 रोजी बुखारी यांनी स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन केला होता.









