अमेरिकेच्या संसदेच्या सभापतींची घेतली भेट
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
तैवानच्या अध्यक्ष साई इंग वेन यांनी बुधवारी अमेरिकेच्या संसदेच्या एका सभागृहाचे सभापती केविन मॅकार्थी यांची भेट घेतली आहे. वेन आणि मॅकार्थी यांच्या या भेटीनंतर चीनचा जळफळाट झाला आहे. या भेटीवरून चीनने तैवान अन् अमेरिकेला धमकी दिली होती. तैवानच्या अध्यक्षांनी चीनच्या धमकीला भीक घातली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लॉस एंजिलिस या शहरात झालेल्या भेटीला प्रतीकात्मक बैठक मानले जात आहे. तैवानच्या अध्यक्ष अमेरिकेनंतर आता दक्षिण अमेरिकेच्या दौऱयावर जाणार आहेत.
चीन तैवानवर स्वतःचा हक्क दर्शवितो. तसेच कुठल्याही देशासोबत तैवानच्या अधिकृत संबंधांना चीनचा विरोध आहे. चीनकडून याचमुळे मॅकार्थी यांना धमकी देण्यात आली होती. कॅलिफोर्नियाचे रहिवासी असलेले मॅकार्थी हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील आहेत. तैवानच्या अध्यक्षांची भेट घेऊन तुम्ही आगीसोबत खेळ करत असल्याचे म्हणत चीनने मॅकार्थी यांना धमकाविले होते.
साई इंग वेन यांना स्वतःच्या सीमेतून प्रवास करण्याची आणि अमेरिकेच्या सभागृहाचे सभापती केविन मॅकार्थी यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीला चीन विरोध करत आहे. हा प्रकार एक चीन सिद्धांताचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी केला आहे.
अमेरिकेने औपचारिक स्वरुपात चीनला मान्यता दिली आहे. तरीही अमेरिकेने तैवानला वेळोवेळी संरक्षण सहाय्य केले आहे. तैवानला अमेरिकेच्या संसदेत दोन्ही पक्षांकडून समर्थन प्राप्त आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात डेमोक्रेटीक पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला होता. पेलोसी यांच्या या दौऱयामुळे चीन चांगलाच भडकला होता. पेलोसी या दोन दशकांमध्ये तैवानचा दौरा करणाऱया पहिल्या अमेरिकन नेत्या ठरल्या होत्या.









