आयपीएल 16 ः धवन, प्रभसिमरनची अर्धशतके, एलिसचे 4 बळी, राजस्थानच्या सॅमसन-हेतमेयर-जुरेल यांचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
कर्णधार शिखर धवन व प्रभसिमरन सिंग यांनी नोंदवलेली दमदार अर्धशतके आणि नाथन एलिसने केलेल्या भेदक गेलंदाजीमुळे पंजाब किंग्सने शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या आयपीएलमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सवर केवळ 5 धावांनी रोमांचक विजय मिळविला. त्यांचा हा दुसरा विजय आहे.
पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 4 बाद 197 धावा फटकावल्या. धवनने नाबाद 86 तर प्रभसिमरनने 60 धावांचे योगदान दिले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 7 बाद 192 धावांवर रोखत पंजाबने विजय साकार केला. नाथन एलिस त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने आपल्या भेदक माऱयावर राजस्थानचे चार बळी टिपले. त्यात जोस बटलर, संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल व रियान पराग यांचा समावेश आहे.
राजस्थानने धावांचा पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण शेवटी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 42 धावा केल्या. त्याने 25 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार मारला. यशस्वी जैस्वालने 8 चेंडूत 11, बटलरने 11 चेंडूत 11, पडिक्कलने 26 चेंडूत 21, परागने 12 चेंडूत 1 चौकार, 2 षटकारांसह 20, शिमरॉन हेतमेयरने 18 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 36, धुव जुरेलने 15 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 32 धावा फटकावल्या. पंजाबच्या एलिसने 30 धावांत 4, अर्शदीप सिंगने 47 धावांत 2 बळी मिळविले.
धवन-प्रभसिमरनची अर्धशतकी भागीदारी
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजी दिली. पण त्याचा हा निर्णय पंजाबचे सलामीवीर धवन व प्रभसिमरन यांनी फोल ठरविला. या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत 9.4 षटकांत 90 धावांची भागीदारी केली. जेसन होल्डरने ही जोडी फोडत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्याने प्रभसिमरनला बटलरकरवी झेलबाद केले. प्रभसिमरनने केवळ 34 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार, 3 षटकारांची आतषबाजी करीत 176 धावांच्या स्ट्राईकरेटने 60 धावा फटकावल्या. तो बाद झाल्यानंतर आलेला भानुका राजपक्षे पहिल्याच चेंडूवर जखमी झाल्याने तो निवृत्त झाला.
नंतर आलेल्या जितेश शर्माने धवनला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 34 चेंडूत 66 धावांची भर घातली. यजुवेंद्र चहलने जितेशला परागकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. जितेशने 16 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार मारत 27 धावा फटकावल्या. यानंतर सिकंदर रझाला अश्विनने एका धावेवर त्रिफळाचीत केले तर शाहरुख खानने धवनसमवेत 21 चेंडूत 37 धावांची भर घातली. शाहरुखने 11 धावा केल्या. शाहरुख शेवटच्या षटकात बाद झाल्याने सॅम करनला 2 चेंडू खेळण्याची संधी मिळाली. तो एका धावेवर नाबाद राहिला तर शिखर धवन 86 धावांवर नाबाद राहिला. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 9 चौकार, 3 षटकार मारले. पंजाबतर्फे जेसन होल्डरने 2 तर आर.अश्विन व चहल यांनी एकेक बळी मिळविले. पंजाबने शेवटच्या 4 षटकांत 39 धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक ः पंजाब किंग्स 20 षटकांत 4 बाद 197 ः प्रभसिमरन सिंग 60 (34 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), शिखर धवन नाबाद 86 (56 चेंडूत 9 चौकार, 3 षटकार), राजपक्षे जखमी निवृत्त 1, जितेश शर्मा 27 (16 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), सिकंदर रझा 1, शाहरुख खान 11 (10 चेंडूत 1 चौकार), सॅम करन नाबाद 1, अवांतर 10. गोलंदाजी ः जेसन होल्डर 2-29, आ.अश्विन 1-25, यजुवेंद्र चहल 1-50.
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 7 बाद 192 ः जैस्वाल 11 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अश्विन 0, बटलर 19 (11 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), पडिक्कल 21 (26 चेंडूत 1 चौकार), रियान पराग 20 (12 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), हेतमेयर 36 (18 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), धुव जुरेल नाबाद 32 (15 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), होल्डर नाबाद 1, अवांतर 10. गोलंदाजी ः नाथन एलिस 4-30, अर्शदीप 2-47.