आपल्या विदूषकी वागणुकीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाही ज्यांची मोठ्या प्रमाणावर थट्टा आणि हेटाळणी केली गेली, ज्यांना त्यांच्या विक्षिप्त वक्तव्यांबद्दल स्वदेशासह जगाने दोष दिला, एकदा नव्हे तर दोनदा महाभियोगाला सामोरे जावे लागले, अशा डोनाल्ड ट्रम्प यांची जेलवारी पार पडली आहे. एका पॉर्नस्टार बरोबर केलेले चाळे लपवण्याच्या प्रकरणात तिला गप्प करण्यासाठी पैसे देऊ केल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. अटक आणि दोष निश्चिती नंतर बाहेर पडताना अमेरिकेचा प्रवास नरकाच्या दिशेने सुरू झाल्याचा साक्षात्कार ट्रम्प महोदयांना झाला. हे करताना त्यांनी चक्क न्यायाधीशांनाही व्यक्तीश: टार्गेट करून आरोप केले. ही उद्दाम वर्तणूक जगाला नवीन नाही. त्यांच्या फटकळ तोंडाने त्यांची जगाच्या सर्वात शक्तिशालीपदी असताना सुद्धा बेअब्रू केली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदावर नसताना त्यांच्या तोंडाचा लगाम सुटला असेल तर तो ट्रम्प त्यांच्या स्वभावाचाच परिणाम मानला पाहिजे. एरवी एखाद्या उद्योगपतीने आपले शौक पूर्ण करण्यासाठी एखाद्या ललनेवर पैशाची उधळण केली तर तो त्याच्या स्वर्गप्राप्तीचा मार्ग मानायला जगाची काही हरकत नसते. इतरांच्या नसत्या भानगडीत पडतो कोण? आणि कशाला? पण, आपल्या सर्वात लहान मुलाच्या जन्मानंतर चार महिन्यांनी ट्रम्प यांनी निम्म्या वयाच्या पॉर्नस्टारशी संबंध वाढवले आणि तिने त्याची वाच्यता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली. ट्रम्प जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्या महिलेच्या वक्तव्याने अडचणी वाढू नयेत म्हणून वकिलामार्फत तिला पैसे देऊन गप्प केले गेले असा खरा आरोप आहे. अर्थात या प्रकरणात ट्रम्प यांना शिक्षा लागली तरीसुद्धा त्यांना पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून अमेरिकेचा कायदा अडवत नाही. पण, प्रकरण केवळ तेवढ्यावर थांबणार नाही. संबंधित महिलेला वकिलामार्फत पैसे देऊन त्याचा हिशोब दाखवताना गोलमाल केला आहे असा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो. या प्रकरणी त्यांना मोठी शिक्षा लागू शकते. हा त्यांच्या विरोधात निवडणुकीत महत्त्वाचा किंवा पराभवास कारणीभूत मुद्दा ठरू शकतो. याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद हातून निसटते आहे म्हटल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊसवर घातलेला धिंगाणा जगाने अजून विसरलेला नाही. त्या प्रकरणात सुद्धा त्यांना अटक होऊ शकते. अशा अडचणीच्या स्थितीत त्यामुळेच ट्रम्पनी अमेरिकेची वाटचाल नरकाच्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले आहे. यावर अमेरिकन जनतेला काय वाटते? ते त्यांना या गुन्ह्याबद्दल माफ करू इच्छित असतील तर त्यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ देतीलच. मात्र कारवाईचे लोकांनी समर्थन केले तर ते ट्रम्प यांचा पराभवही करू शकतात. अर्थातच अमेरिकन जनता स्वच्छेने योग्य तो निर्णय घेईलच. ट्रम्प यांच्या फसव्या प्रचाराला भुलून जनतेने एकदा त्यांना संधी दिली आणि त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. हे जगाने पाहिलेले आहे. अमेरिका पुन्हा तशीच चूक करेल असे आज तरी वाटत नाही. बेजबाबदार व्यक्तिमत्त्वाचे नेते जर राष्ट्राच्या प्रमुखपदी, त्यातही जगाचे नशीब ठरवणाऱ्या राष्ट्राच्या प्रमुखपदी विराजमान असतील तर त्यांच्या काळात जग अनिश्चिततेच्या गर्तेत अडकल्यावाचून राहत नाही. रशियाचे पुतीन, अमेरिकेचे ट्रम्प आणि चीनचे जिनपिंग या आत्मकेंद्री नेतृत्वांच्या काळात जगाला घाम फुटला नसता तरच नवल. तरी अमेरिकेच्या सुज्ञ मतदारांनी ऐनवेळी निवडणुकीत आपला मताचा तराजू ट्रम्प यांच्या आपमतलबी बाजूला न झुकवता त्यातल्या त्यात उदारमतवादी बायडन यांच्या बाजूने झुकवला. म्हणून जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. नाहीतर जगातल्या या बेफाम सत्ताधीशांमुळे कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले असते कोण जाणे. पुतीन यांच्या हेक्मयामुळे जग युव्रेन युद्धाच्या समस्येला सामोरे जात आहे. अन्न टंचाई, महागाई आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे जगातील अनेक अर्थव्यवस्थांना धोका निर्माण झाला आहे. तशातच पुतीन यांच्याशी हातमिळवणी करणारा जिनपिंग यांचा देश चीन शेजाऱ्यांच्या कुरापती काढत आहे. भारताला अऊणाचल प्रदेशात चीनचा जाच सहन करावा लागतोय. साबरमतीच्या किनारी त्यांच्यासोबत घेतलेले झोके आणि महाबलीपुरमच्या गडगडत्या दगडाखाली उभे राहून काढलेला फोटोचा आता मोदी यांना नक्कीच पश्चाताप होत असेल. दोन महान सत्ता पुन्हा एकत्र येऊन इतिहास बदलायचे राहिले बाजूला, जिनपिंग भारताचाच भूगोल बदलण्याच्या नादाला लागले आहेत. अफगाणिस्तानातून स्वत:चा हात बाजूला काढताना ट्रम्प यांनी तिथे भारताला गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. त्यापासून अलिप्त राहण्याचा कसोशीने प्रयत्न करत गरजेपुरती मध्यस्थी करायची आणि पुन्हा बाजूला व्हायचे असे धोरण ट्रम्प यांची कारकीर्द संपेपर्यंत भारताने पाळले. आता ट्रम्प यांची झाडाझडती सुरू झाली आहे. यापूर्वी त्यांच्या भारतीय वंशाच्या प्रचार प्रमुखाला जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती. असंगाशी संग असा नडतो. एकेकाळी स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी ट्रम्प यांनी जे काही केले असेल त्यामुळे आता त्यांना नरकाची अनुभूती येत आहे आणि नरकात आहे म्हटल्यावर यातना सोसणे आलेच! त्यामुळे त्यांचा स्वर्ग-नरक त्यांना लखलाभ. काय ते त्यांच्या जनतेने ठरवावे, याहून भारताची प्रतिक्रिया वेगळी नक्कीच नसेल.
Previous Articleदुसऱ्या सत्रात सेन्सेक्स 583 अंकांनी वधारला
Next Article पाच भारतीय क्रिकेटपटूंना ‘एमसीसी’चे आजीवन सदस्यत्व
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








