अध्याय सविसावा
भगवंतानी संत संगतीचे महत्त्व समजावून सांगितल्यावर उद्धवाने देवांना विनंती केली की, देवा संत कुणाला म्हणावं किंवा संत कसे ओळखावेत हे मला सविस्तर समजावून सांगा. उद्धवाच्या या विनंतीमुळे देव प्रसन्न झाले आणि संतांची लक्षणे कोणती, हे श्रीकृष्ण मोठ्या आवडीने उद्धवाला सांगू लागले. ते म्हणाले, संतांना कशाचीही अपेक्षा नसते. त्यांचे चित्त माझे ठायी जडलेले असते. ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात. त्यांचे ठिकाणी मी माझेपणा नसतो. सुखदु:खादी द्वंद्वे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत. साधूंचे गुण अनंत आहेत पण त्यांतील आठ लक्षणे निवडून काढून मी तुला सांगतो. लाभ किंवा हानी साधूंच्या चित्ताला बाधा करू शकत नाही. त्यांचे चित्त नेहमी भगवंताकडेच लागलेले असते म्हणून त्यांना कोणतीच अपेक्षा नसते. उद्धवा! साधूजवळ असलेला निरपेक्षपणाचा ठेवा, हा साधूचा पहिला गुण होय. म्हणून साधकाने निरपेक्षतेने कर्मे करण्यास सुरवात करावी. सुरवातीला हे सहजी शक्मय होणार नाही कारण काही ना काही फल मिळावे या उद्देशानेच सर्वजण कर्मे करत असतात. जेव्हा साधकाच्या लक्षात येते की, अपेक्षा करून कर्म करण्याने बहुधा दु:खच पदरात पडते तेव्हा तो आपणहून निरपेक्षतेने कर्मे करण्यास सुरवात करतो परंतु कर्म केल्यावर फल हे मिळतेच म्हणून तो मिळालेले फल मलाच अर्पण करतो. कर्म करत असताना त्याला माझे सतत स्मरण होत असते त्यातून त्याला आपोआपच आत्मज्ञान प्राप्त होते. सदासर्वकाळ तो माझ्या चैतन्याचेच सदैव चिंतन करत असतो. माझे चिंतन करताकरता त्याच्यात माझे निर्मोही असणे आणि निरपेक्ष असणे हे गुण उतरतात. त्यामुळे नवीन पाप पुण्याची निर्मिती होत नाही व तो संसारबंधनातून मुक्त होतो. त्यामुळे तो माझ्यासारखाच होतो. आमच्या दोघांच्या चित्ताचे स्वरूप एकच होते. याचंच नांव ‘मच्चत्ति’ होणे होय. मच्चत्ति झालेला भक्त पूर्ण ‘निरक्षेप’ होतो. सतत माझे चिंतन करत राहिल्याने त्याला निर्मोही आणि निरपेक्ष अशा माझी प्राप्ती होते. म्हणून निरक्षेप होण्याकरिता जागेपणी, स्वप्नात व सुषुप्तीत चित्स्वरूपी चित्त जडून राहणे ह्याचेच नाव ‘मच्चत्ति’ होय. हा संतांचा दुसरा गुण आहे. प्रारब्धानुसार देहाची अवस्था कशीही असो तो सदैव माझेच चिंतन करत असतो. देह लक्ष्मीने शृंगारला किंवा आपत्तीने ग्रस्त झाला, तरी उद्धवा, चित्त परमानंदांतच निमग्न असणे ह्याचंच नाव ‘मच्चत्ति’ होय. चित्त कामलोभादि दोषरहित होऊन परमानंदांत जडून राहिले म्हणजे तेथे सुखाने शांती वास करते. अशा चित्ताला ‘प्रशांत’ असे म्हणतात. जरी कोणी भक्ताच्या जीवावर बेतेल असा अपराध केला, तरी त्याला जो कधी ‘दुष्ट’ असे म्हणत नाही, उलट त्या अपकार करणाऱ्यावरही अत्यंत उपकार करतो, त्याच्या शांतीला उत्कृष्ट शांती असे नाव आहे. अशा भक्ताचे सर्वस्व जरी ठकवून नेले, तरी त्याला राग येत नाही. त्यामुळेच प्रशांतपणा अंगी बाणतो. जो सर्वभूती ब्रह्मभाव बाळगतो तो ब्रह्मभावनेनेच सर्व प्राणिमात्रांवर विश्वास ठेवतो आणि त्याबद्दल त्याच्या चित्तात कधी अन्य विचार येत नाहीत. हाच ‘प्रशांतता’ नामक तिसरा गुण होय. हा प्रशांतता गुण अंगी कसा येतो ते सांगतो. समोर दिसणारी प्रत्येक वस्तू नाशवंत आहे हे लक्षात आले की, जे नाशवंत नाही असे ब्रह्म जगामध्ये परिपूर्ण भरलेले आहे अशी खात्री पटते. मग समोर दिसणाऱ्या व्यक्तीतील गुणदोषांची त्याला मात्तबरी वाटत नाही. त्याला सर्वजण ब्रह्मरूपच वाटू लागतात त्यामुळे तो सर्वांशी सारखेपणाने वागतो. जग पाहू गेले असता सर्वत्र वैषम्यच भरलेले, पण त्या वैषम्यातच जो ‘सम ब्रह्म’ पाहतो, तोच खरा ‘समदर्शी’ होय. हाच निरुपम चौथा गुण समजावा. ही समदृष्टि हाती येण्याकरिता भक्तिभावाने भगवंताचे भजन करत रहावे. म्हणजे सर्वत्र ईश्वरी अस्तित्व जाणवत राहते आणि त्याप्रमाणात इतरांचे व शेवटी स्वत:च्याही अस्तित्वाचा विसर पडतो. यासाठी सर्वत्र ईश्वर पाहण्याबरोबरच, अहंता व ममता निखालस सोडून दिली पाहिजे.
क्रमश:








