पणजीत सुरु असलेले स्मार्ट सिटीचे काम पाहता पणजी स्मार्ट होणार की कोलमडणार? हा प्रश्न रोज गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पणजीत येणाऱ्या-जाणाऱ्या गोमंतकीयांना सतावत आहे. एकंदरीत विकास ही निरंतर प्रक्रिया असली तरी या नव्या बांधकामांनंतरही ‘ओल्ड इज गोल्ड’ म्हणण्याची वेळ पणजीकरांवर येऊ नये, एवढीच प्रार्थना देवी श्री महालक्ष्मी चरणी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शहरांना ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी ज्या पहिल्या शंभर शहरांची निवड केली त्यामध्ये गोव्याची राजधानी पणजी शहराचीही निवड केली. या योजनेला निधीची कमतरता भासत नाही. देशातील अनेक शहरांची ‘स्मार्ट सिटी’ योजनेमुळे उल्लेखनीय सुधारणा झाली आहे. वाराणसी, आग्रा, भोपाल, इंदोर, भूवनेश्वर, चेन्नई, कोईंबतूर, रांची, सालेम, सुरत, उदयपूर, विशाखापट्टणम, पुणे, वेल्लोर, पिंपरी-चिंचवड, मदुराई, अहमदाबाद, तिरुचिरापल्ली या व अशा अनेक शहरांचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारकडून भरपूर निधी, व तो वेळेत मिळत असल्याने कामे न रखडता नियोजित वेळेत पूर्ण होतात. त्यामुळे शहरांतील साधनसुविधांमध्ये विकास व विस्तार झाला. अनेक समस्यांचे निवारण झाले आहे. शहरांचा कायापालट होऊन स्थानिकांचे जगणे सुसह्या होण्यास मदत झाली. तसेच पर्यटकांचे त्या शहरांमधील वास्तव्य आनंददायी ठरले. मात्र पणजीत सुरु असलेले स्मार्ट सिटीचे काम पाहता पणजी स्मार्ट होणार की कोलमडणार? हा प्रश्न पणजीकरांसह रोज गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पणजीत येणाऱ्या-जाणाऱ्या गोमंतकीयांना सतावत आहे. मोठ्या आकर्षणाने गोव्याकडे येणाऱ्या पर्यटकांनाही पणजीत त्रासांना, समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अत्यंत सुनियोजित अशा पणजीत गेल्या तीन-चार वर्षांपासून कशावरच नियंत्रण राहिलेले नाही. पणजीकर आता हैराण झाले आहेत. कोट्यावधी रुपये खर्चून मांडवी नदीवर उभारलेला ‘अटल सेतू’ सुरुवातीपासून वादात आहे. आधुनिक तंत्रज्ञान फोल ठरल्याने हा पूल ख•sमय झाला. दुरुस्तीसाठी हा पूल वारंवार बंद ठेवावा लागत असल्याने पर्वरीपासून, पणजी शहर, मेरशी, बांबोळीपर्यंत असह्या वाहतूक कोंडी होत आहे. दुसऱ्या बाजूने पणजी शहरातील स्मार्ट सिटीच्या बांधकामांनी पणजीकरांना रडकुंडीला आणले आहे. त्यातच जी 20 परिषदेच्या बैठका पणजीत होत असल्याने त्यासंदर्भातील सुशोभिकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, विद्युतीकरण अशी सगळी कामे एकाचवेळी करण्यात येत असल्याने पणजी स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाला आहे.
पणजीकरांनी व्यथा मांडावी कुणाकडे?
आपली व्यथा मांडावी तरी कुणाकडे? या विवंचनेत सारे पणजीकर आहेत. सगळे अधिकारी, यंत्रणा, संस्था, लोकप्रतिनिधी सुस्त आहेत. कुणी एखादा बोललाच तर तो स्वत: सोडून इतरांवर खापर फोडून मोकळा होतो. पणजीकरांची व्यथा वर्तमानपत्रांतून मांडली जात आहे. मात्र महसूलमंत्री तथा पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात म्हणतात, पणजीत सुरु असलेल्या कामांबाबत पणजीकरांची काहीच तक्रार नाही. एखादा कुणी आपल्या नगरसेवकास विचारु लागला तर तो म्हणतो, हा माझा विषय नाही. महापालिकेत विचारायला गेल्यास तिथेही सारेचजण हात वर करुन मोकळे होतात. गावात एखादी समस्या असल्यास ग्रामसभेत तो मुद्दा उपस्थित करुन त्यावर चर्चा करुन समाधानकारक तोडगा काढता येतो, पण आम्ही महापालिकेत असल्याने आमच्या नशिबी तेही नाही. आम्ही पणजीकरांनी करायचे तरी काय, व्यथा मांडायची तरी कुणाकडे? हा प्रश्न पणजीकर दबल्या आवाजात आपसात उपस्थित करतात.
नियोजनाच्या अभावाचा परिणाम
पणजीच्या सर्व भागात विविध कारणांसाठी रस्ते खोदण्यात आल्याने धुळीचे साम्राज्य पसरले असून त्याचा दुकानदार, ग्राहकांना त्रास होतोय. रस्त्यांवर एकाचवेळी ख•s, चर खोदल्याने वाहनचालकांना इच्छीत स्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळे वाहने मिळेल त्या रस्त्याने हाकली जातात. साहजिकच ‘नो एंट्री’ आणि ‘वन वे’ नियमांचे उल्लंघन करावे लागते. अशावेळी अपघातही होतात. ही सर्व कामे 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करायची आहेत, कारण 17 एप्रिलपासून जी 20 परिषदेच्या बैठकांना प्रारंभ होणार आहे. स्मार्ट सिटीची कामे, जी 20 ची कामे आणि अटल सेतू बंद असल्यामुळे पणजीकरांसह रोज गोव्याच्या कानाकोपऱ्यातून पणजीत येणाऱ्या-जाणाऱ्या गोमंतकीयांची दमछाक झाली आहे.
पणजीकरांच्या व्यथेचे कुणालाच काही पडलेले नाही. पणजीचे महापौर कुचकामी ठरले आहेत. त्यांना पदावरुन हटवा, अशी मागणी करण्याचे धाडस उत्पल पर्रीकर यांनी केले, त्यातून त्यांच्यातील पणजीकरांबद्दलची कणव दिसून येते. मोन्सेरात म्हणतात, पणजी स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल महापालिकेला जबाबदार धरु नका.
प्राप्त परिस्थितीतीवर मात केली नाही, तर पावसाळ्यात पणजीची जी अवस्था होऊ शकते तिची कल्पनाच करवत नाही. ज्याला आपण पणजी शहर म्हणतो त्याचा अर्धा अधिक भाग पूर्वी मांडवी नदीचा भाग होता. त्यामुळे आजही जेव्हा ख•s खोदण्यात येतात तेव्हा खालून माती नव्हे, तर रेती व चिखल सापडतो. खोदलेले ख•s, चर नैसर्गिक पद्धतीने, योग्य प्रकारे बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात येत नाही, त्यामुळे बुजविलेल्या ख•dयांमध्ये वाहने पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आता ही परिस्थिती तर पावसाळ्यात काय होईल? खोदकाम करताना जो चिखल व रेती काढली, ती गटारांतून वाहून गेल्यामुळे गटारे तुंबली आहेत, याकडे कुणाचे आहे लक्ष? मलनिस्सारणासाठी जे चेंबर्स बांधण्यात येत आहेत, त्यासाठी रेतीऐवजी मुरास व खारे पाणी वापरल्याच्या बातम्या, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अगोदर असलेले डांबर न काढता त्याच्यावरच नवे डांबरीकरण होत असल्याने रस्ते उंच झाले असून गटारे कुचकामी ठरणार असून पावसाळ्यात बाजूच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी येणार नाही, याची हमी कोण देऊ शकतो? अगोदरचे चांगल्या दर्जाचे सिमेंट, किंवा पेवर्स काढून त्याठिकाणी अत्याधुनिक म्हणून जे पेवर्स घातले जात आहेत, त्यावरुन जाताना वाहने, विशेषत: दुचाकी गडगडतात. विकास ही निरंतर प्रक्रिया असली तरी या नव्या बांधकामांनंतरही ‘ओल्ड इज गोल्ड’ म्हणण्याची वेळ पणजीकरांवर येऊ नये, एवढीच प्रार्थना देवी श्री महालक्ष्मी चरणी!
राजू भिकारो नाईक








