तेल दरवाढीचा परिणाम, पर्यायी शेतीकडे कल : आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती करणे बनले सोयीचे
बेळगाव ; भातशेती हे तालुक्यातील प्रमुख पीक असले तरी आता शेतकरी पर्यायी शेतीकडे वळू लागला आहे. रब्बी हंगामात भाजीपाला व कडधान्याबरोबर काही शेतकऱ्यांनी सूर्यफुलांची लागवड केली आहे. बेकिनकेरे येथील उचगाव-कोवाड मार्गावर असलेली सूर्यफुलांची शेती ये-जा करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करू लागली आहे. तेलांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने काही शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी हंगामात सूर्यफुलाची लागवड केली आहे. सूर्यफुलाच्या तिळापासून तेलाची निर्मिती केली जाते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पर्यायी शेती म्हणून सूर्यफूल लागवड केली आहे. शेतीमध्ये गेल्या काही एक-दोन दशकांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होऊ लागला आहे. काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान शेती व्यवसायात सामील झाल्यामुळे शेती करणे सोयीचे बनले आहे. शिवाय शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला बगल देण्यास सुरुवात केली आहे.
युद्धापासून तेलदरात वाढ
रशिया-युक्रेन युद्धापासून खाद्यतेलांच्या किंमती भरमसाट वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. वाढत्या खाद्यतेलामुळे काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतीत सूर्यफुलाची लागवड केली आहे. सूर्यफुलांच्या तेलालादेखील बाजारात मागणी अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा सूर्यफूल शेतीकडे वळू लागला आहे. उन्हाळी हंगामात भाजीपाला, कडधान्य आणि इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. दरम्यान बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे कडधान्य पीक वाया गेले आहे. मात्र सूर्यफूल शेतीवर हवामानाचा कोणताही परिणाम झाला नाही. लागवड केलेली सूर्यफूल शेती सध्या बहरून आली आहे. सूर्यफुलाची काढणी केल्यानंतर त्यांच्या बीयापासून तेलनिर्मिती हेणार आहे. तर उर्वरित भाग जनावरांना खाद्य म्हणून उपयोगी पडते.
पर्यायी पीक म्हणून सूर्यफुलाची लागवड
वाढत्या खाद्यतेलांच्या दरामुळे यंदा सूर्यफुलाची लागवड केली आहे. सध्या शेती सूर्यफुलाने बहरून आली आहे. पर्यायी पीक म्हणून ही लागवड केली आहे. यामुळे तेलही होते. आणि जनावरांना खाद्यदेखील मिळते. सूर्यफुलाच्या तेलाला बाजारात देखील मागणी आहे. विक्री करणे देखील सोयीस्कर होणार आहे.
– जोतिबा भोगण (बेकिनकेरे)









