दिल्ली कॅपिटल्स सहा गड्यांनी पराभूत, साई सुदर्शनचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 11 चेंडू बाकी ठेवून सहा गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा सलग दुसरा विजय आहे.
दिल्ली कॅपिटल्सने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 बाद 162 धावा जमवल्या. गुजरात संघातर्फे मोहम्मद शमी आणि रशिद खान यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्यानंतर गुजरात टायटन्सने 18.1 षटकात 4 बाद 163 धावा जमवत आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

या स्पर्धेतील हा सातवा सामना आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार वॉर्नर आणि शॉ यांनी सलामीच्या गड्यासाठी 16 चेंडूत 29 धावांची भर घातली. मोहम्मद शमीने शॉला झेलबाद केले. त्याने 5 चेंडूत 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. शमीने दिल्लीला आणखी एक धक्का पाठोपाठ देताना मिचेल मार्शचा त्रिफळा उडविला. त्याने 1 चौकारासह 4 धावा जमविल्या. वॉर्नर आणि सर्फराज खान यांनी तिसऱ्या गड्यासाठी 30 धावांची भागीदारी 4 षटकात केली. मात्र 67 या धावसंख्येवर दिल्लीने आपले 2 फलंदाज पाठोपाठ गमविले. जोसेफने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. त्याने 32 चेंडूत 7 चौकारांसह 37 धावा जमविल्या. त्यानंतर अल्झारी जोसेफने आपल्या याच षटकातील पुढील चेंडूवर रॉसोला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. सर्फराज खान आणि अभिषेक पेरेल यांनी पाचव्या गड्यासाठी 34 धावांची भर घातली. रशिद खानने पोरेलचा त्रिफळा उडविला. त्याने 11 चेंडूत 2 षटकारांसह 20 धावा जमविल्या. रशिद खानने सर्फराज खानला झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 2 षटकारांसह 30 धावा जमविल्या. अष्टपैलू अक्षर पटेलने समयोचित फटकेबाजी केल्याने दिल्ली कॅपिटल्सला 162 धावांपर्यंत मजल मारता आली. शमीने अक्षर पटेलला झेलबाद केले. तत्पूर्वी, रशिद खानने अमन हकिम खानला 8 धावांवर बाद केले. अक्षर पटेलने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा जमविल्या. नॉर्त्जेने 2 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 4 धावा केल्या. कुलदीप यादव 1 धावावर नाबद राहिला. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. गुजरातच्या गोलंदाजांनी 11 वाईड चेंडू टाकल्याने दिल्लीला अवांतराच्या रुपात 15 धावा मिळाल्या. गुजराततर्फे मोहम्मद शमीने 41 धावात 3, रशिद खानने 31 धावात 3 तर जोसेफने 29 धावात 2 गडी बाद केले.

साई सुदर्शनचे नाबाद अर्धशतक
प्रत्युत्तरादाखल खेळताना सहा आणि गिल या सलामीच्या जोडीने 13 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. नॉर्त्जेने सहाचा त्रिफळा उडवला. त्याने 7 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 14 धावा जमवल्या. नॉर्त्जेने गुजरात टायटन्सला आणखी एक धक्का देताना शुभमन गिलला त्रिफळाचित केले. 13 चेंडूत 3 चौकारासह 14 धावा जमवल्या. खलिल अहमदने कर्णधार हार्दिक पंड्याला केवळ 5 धावावर पोरेलकरवी झेलबाद केले. गुजरातने यावेळी 6 षटकात 3 बाद 54 धावा जमवल्या होत्या.
साई सुदर्शन आणि विजय शंकर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. मार्शने विजय शंकरला पायचित केले. त्याने 23 चेंडूत 3 चौकारासह 29 धावा जमवल्या. साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 56 धावांची भागीदारी करत विजयाचे सोपस्कार 11 चेंडू बाकी ठेवून पूर्ण केले. साई सुदर्शनने 48 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 62 तर डेव्हिड मिलरने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 29 धावा झळकवल्या. दिल्ली कॅपिटल्सतर्फे नॉर्त्जेने 2 तर खलिद अहमद आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. गुजरातच्या डावामध्ये 5 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स : 20 षटकात 8 बाद 162 (वॉर्नर 37, शॉ 7, मार्श 4, सर्फराज खान 30, रॉसो 0, पोरेल 20, अक्षर पटेल 36, अमन हकिम खान 8, नॉर्त्जे नाबाद 4, कुलदीप यादव नाबाद 1, अवांतर 15, मोहम्मद शमी 3-41, रशिद खान 3-3dर1, जोसेफ 2-29).
गुजरात टायटन्स : 18.1 षटकात 4 बाद 163 (सहा 14, शुभमन गिल 14, साई सुदर्शन नाबाद 62, हार्दिक पंड्या 5, विजय शंकर 29, डेव्हिड मिलर नाबाद 31, अवांतर 8, नॉर्त्जे 2-39, खलिल अहमद 1-38, मिचेल मार्श 1-24).








