पणजी : पर्वरीपासून पणजीपर्यंत आणि संपूर्ण पणजी शहरात काल सोमवारी वाहतुकीचा खोळंबा झाला. भर उन्हात तासनतास वाहनात बसून रहावे लागल्याने वाहनचालकांचा जीव हैराण झाला. दुचाकीवाल्यांना उन्हाच्या त्रासाबरोबरच वाहनांच्या धुराचाही त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या नियोजित कामांचा खेळखंडोबा झाला. अनेक विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. मांडवीवरील ‘अटल सेतू’चे काम सुऊ असून मडगाव, फोंडा या दिशेने जाणारी वाहने जुन्या मांडवी पुलावरून वळविण्यात आल्याने पणजीत येणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. जी 20 परिषद अवघ्या काही दिवसांवर आली असून पणजीतील रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण सुऊ आहे. तसेच अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुऊ आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून पर्वरी, पणजीत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
‘अटल सेतू’ पुन्हा बंद
दरम्यान अटल सेतू काल सोमवारपासून तात्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश वाहतूक पोलीस अधीक्षकांनी जारी केला आहे. सध्या सुरू असलेले अटल सेतूचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी अटल सेतू वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे.
सर्वांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे
अटल सेतूवरील काम लवकर पूर्ण करण्यासाठी अटल सेतूच्या सर्व लेन्स काम पूर्ण होईपर्यंत सर्व श्रेणीतील वाहनांच्या हालचालेसाठी तात्काळ बंद केल्या जात आहेत. सर्व वाहनचालक, परीक्षार्थी इत्यादींनी कृपया याची नोंद घ्यावी आणि त्यानुसार स्वत:च्या प्रवासाचे नियोजन करावे. वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आदेशात म्हटले आहे.
कोर्तिनमधील कामामुळे कोंडी
पणजीतील मुख्य चर्चच्या परिसरातून कोर्तिनमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर काल सोमवारी अचानक वाहिनी टाकण्याचे काम सुरु केल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पणजीतून बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्याचबरोबर मळा, भाटले, सांताव्रुझ, बांबोळीकडे जाणाऱ्या वाहनचाकांची कोंडी झाली. या सर्व वाहनचालकांना तेथून माघारी फिरुन जुन्या सचिवालयाकडून, जुन्या उच्च न्यायालय इमारत परिसराकडून मळा व पुढच्या भागात जावे लागले. पाचशे मीटरच्या अंतरासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालून वाहनाचालकांना जावे लागले.









