प्रतिनिधी/ म्हापसा
येथील जुन्या पालिका इमारतीजवळच काम चालू असलेल्या इमारतीच्या स्लॅबचा काहीभाग कोसळून पाच कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. इमारत मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असल्याने या घटनेमुळे वाहतुक काहीकाळ खोळंबली. म्हापसा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेउढन जखमींना जिल्हा इस्पितळात नेले.
घटनास्थळी 15 कामगार कामावर होते. जखमी झालेल्या कामगारांमध्ये सिबू ठाकूर (30, रा. जुने गोवे), दिलीपकुमार (25), रणजीतकुमार (30), गौतम यादव (20) राहणार म्हापसा सर्व मूळ बिहारचे. सुहेल राणा (22) मुळ पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. जखमींची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
वास्तूशिल्पकार म्हांबरे हे या इमारतीचे अभियंता म्हणून काम पाहत आहेत. निकृष्ट दर्जाचा माल वापरला जात असल्यामुळे स्लॅब कोसळला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीला वापरण्यात येणाऱ्या रेतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याची सखोल चौकशी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत संबंधीत कंत्राटदार व अभियंत्या विरोधात गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.









