प्रतिनिधी/ बेळगाव
पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या असून, विज्ञान शाखेचे विद्यार्थी आता सीईटी व जेईई परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीईटी व त्यानंतर जेईई परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांकडे केवळ महिनाभराचा कालावधी असून, परीक्षेची तयारी करीत आहेत.
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनियरिंग, आयआयटी यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी व जेईईसारख्या परीक्षा द्याव्या लागतात. कर्नाटक परीक्षा मंडळाकडून राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. इंजिनियरिंग तसेच इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी आवश्यक असते. सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पुढील प्रवेश अवलंबून असल्याने विद्यार्थी बारावीच्या बोर्ड परीक्षेइतकीच सीईटी व जेईई या परीक्षांची तयारी करतात.
सीईटी व जेईई या परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळाल्यास रँकिंगनुसार राज्यातील सरकारी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येतो. त्याचबरोबर खासगी इंजिनियरिंग कॉलेजमध्येही प्रवेश मिळविता येतो. आयआयटीसारख्या नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे अनेक विद्यार्थ्यांचे ध्येय असल्यामुळे तशा पद्धतीने मागील वर्षभरापासून तयारी सुरू असते. पीयूसी परीक्षा झाल्यानंतर सीईटी व जेईई परीक्षा घेतली जाते.
खासगी क्लासेसना पसंती
सीईटी व जेईई परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी खासगी क्लासेसना पसंती दिली जात आहे. बारावीच्या सुरुवातीपासूनच काही विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या तयारीसाठी खासगी शिकविण्या लावल्या आहेत. बेळगावमध्ये अनेक नामांकित खासगी क्लासेस दाखल झाले असून, जेईई व सीईटी परीक्षांमध्ये यश मिळवून देऊ असे आश्वासन विद्यार्थ्यांना देत आहेत.









