शेजारच्या गावांमध्ये घबराट : वन कर्मचाऱ्यांकडून शोधमोहीम
► वृत्तसंस्था/ कुनो
कुनो नॅशनल पार्कमधून एक नामिबियन चित्ता अधिवास क्षेत्राबाहेर पडला असून शेजारच्या एका गावात पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या चित्त्याचे नाव ओबान असे सांगितले जात आहे. त्याला सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून भारतात आणण्यात आले होते. फेब्रुवारीमध्येच या चित्त्यांना क्वारंटाईन बंदिवास क्षेत्रातून मोकळ्या जंगलात सोडण्यात आले होते. कुनोबाहेर पडलेला चित्रा जिह्यातील विजयपूर तहसीलमधील गोली पुरा आणि झार बडोदा गावांजवळील भागात आहे. त्याच्या मागावर असलेले वनाधिकारी आणि गावकरी विशेष शोधमोहीम राबवत आहेत. या मोहिमेसाठी वनविभागाचे विशेष पथकही घटनास्थळी पोहोचले असून ओबानचा शोध सुरू आहे.
रविवारी सकाळच्या सुमारास शेतात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ घाबरले. सुरक्षेसाठी सर्व ग्रामस्थांनी हातात लाठ्या घेतल्या. यासोबतच बिबट्या बाहेर पडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभाग आणि चित्ता प्रकल्प अधिकारीही तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. बिबट्या किंवा कोणत्याही नागरिकाच्या सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. तसेच सदर चित्ता आपोआप आपल्या अधिवास क्षेत्रात जाईल, असे कुनो नॅशनल पार्कचे डीएफओ प्रकाश वर्मा यांचे म्हणणे आहे. ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये या चित्त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. गेल्यावषी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो येथे नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना सोडले होते. त्यांना 50 दिवस लहान विशेष विलगीकरण क्षेत्रात ठेवल्यानंतर अलीकडेच मोठ्या बंदिस्तात हलवण्यात आले होते. त्याचदरम्यान 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्त्यांची दुसरी तुकडी कुनो येथे आणण्यात आली होती.









