तब्बल 66.9 कोटी लोकांसह कंपन्यांच्या माहितीवर डल्ला : 8 मोठ्या शहरांसह 24 राज्यांमध्ये व्याप्ती
वृत्तसंस्था/ सायबराबाद (तेलंगणा)
तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी 66.9 कोटी लोक आणि कंपन्यांचा डेटा चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आणत संबंधित व्यक्तीला शनिवारी अटक केली. डेटाचोरीसंबंधीची देशातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 24 राज्ये आणि 8 मोठ्या शहरांमध्ये या डेटाचोरीची व्याप्ती पसरलेली आहे. विनय भारद्वाज असे आरोपीचे नाव आहे. तो फरिदाबाद, हरियाणा येथून एका वेबसाईटद्वारे या कारनाम्यांवर काम करत होता. तसेच चोरलेला डेटा क्लाउड ड्राईव्ह लिंकद्वारे ग्राहकांना विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशातील सर्वांत मोठी डेटा चोरी उघड झाल्याने देशात खळबळ निर्माण झाली आहे. तब्बल 66.9 कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, कुणाचा वैयक्तिक डेटा अशी माहिती असल्याचे समजते. पोलिसांनी संबंधिताला अटक करण्याबरोबरच 2 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त केले आहेत. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात कोट्यावधी लोकांचा वैयक्तिक डेटा होता. या सायबर चोराकडे व्रेडिट कार्डपासून ते लोकांच्या मार्कशीटपर्यंतचा डेटा सापडला आहे.
नेटवर्क हरियाणात, जाळे देशभर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरियाणातील फरिदाबाद येथील वेबसाईटद्वारे ग्राहकांना डेटा ऑनलाईन विकत होता. पोलिसांना आरोपीकडे बायजूस आणि वेदांतूसारख्या ऑनलाईन शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्थांचा डेटाही मिळाला आहे. यासोबतच 24 राज्यांचा जीएसटी आणि आरटीओचा डेटाही या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच दिल्लीतील वीज ग्राहक, डी-मॅट खाते, अनेक लोकांचे मोबाईल नंबर, एनईईटीच्या विद्यार्थ्यांचा डेटा, देशातील अनेक श्रीमंत व्यक्तींशी संबंधित गोपनीय माहिती, विमाधारकांचे तपशील, व्रेडिट आणि डेबिट कार्डसह भरपूर माहितीही आहे.
सोशल मीडियासंबंधीही तपशील उघड
जीएसटी आणि आरटीओ यांसारख्या मोठ्या संस्थांव्यतिरिक्त, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स, यूट्यूब, पेटीएम, फोनपे, बिग बास्केट, बुक माय शो, इन्स्टाग्राम, झोमॅटो, पॉलिसी बाजार यासारख्या कंपन्यांचा डेटा देखील प्राप्त झाला आहे. सरकारी अधिकारी आणि लष्करी अधिकारी, पॅनकार्डधारक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, वीज ग्राहक, डी-मॅट खातेधारक अशा बऱ्याच लोकांच्या डाटावरही डल्ला मारण्यात आला आहे. पॅन कार्डधारकांच्या चोरी झालेल्या डेटामध्ये उत्पन्न, ई-मेल आयडी, फोन नंबर यासारख्या माहितीचा समावेश आहे.









