5 एप्रिलपासून होणार सुरुवात : निवडणुकीमुळे निकालास विलंब होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
बारावीची परीक्षा संपली असून, 5 एप्रिलपासून पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे. बेळगाव शहरातील 5 केंद्रांवर 400 हून अधिक प्राध्यापक पेपर तपासणी करणार आहेत. परंतु पेपर तपासणीला उशीर लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही प्राध्यापकांना निवडणुकीच्या विविध कामांमध्ये गुंतविल्याने याचा परिणाम निकालावर होण्याची शक्यता आहे.
29 मार्चला बारावीची परीक्षा संपली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान विभागात 21 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. पेपर तपासणी केंद्रांवर केंद्र प्रमुखांची निवड करण्यात आली असून 3 एप्रिलपासून तपासणी केंद्रांवर उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
जीएसएस कॉलेज, मराठा मंडळ कॉलेज, गोगटे कॉलेज, एस. एस. मिरजी कॉलेज व आरएलएस कॉलेज येथे पेपर तपासणी केली जाणार आहे. यासाठी 400 हून अधिक प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पदवीपूर्व शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
मूल्यमापनासाठी 30 टक्के प्राध्यापक उपलब्ध नसल्याची माहिती
निवडणुकीच्या कामासाठी पदवीपूर्व विभागाचे प्राध्यापक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे याचा परिणाम मूल्यमापनावर होण्याची शक्यता आहे. मूल्यमापनामध्ये राज्यातील 30 टक्के शिक्षक उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी 20 दिवसांमध्ये पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेसाठी यावर्षी मात्र महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. प्राध्यापकांची गरज भासल्यास खासगी पदवीपूर्व कॉलेजच्या प्राध्यापकांनाही मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा विचार सुरू आहे.









