विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न : 95 टक्के शाळांमध्ये पुस्तके उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील शैक्षणिक वर्षात पाठ्यापुस्तकांचा वेळेवर पुरवठा झाला नसल्याने गोंधळ झाला होता. याची खबरदारी घेत शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच 95 टक्के शाळांमध्ये पाठ्यापुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. यामुळे उन्हाळी सुटीमध्येही विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.
पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा पूर्ण झाल्या असून, मूल्यमापनाचे काम सुरू आहे. मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाला 29 मेपासून सुरुवात होणार आहे. दि. 29 मे ते 7 ऑक्टोबर हे प्रथम सत्र असेल तर 25 ऑक्टोबर ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान द्वितीय सत्र होणार आहे. दि. 8 ते 24 ऑक्टोबर दरम्यान दसरा सुटी दिली जाणार आहे. दि. 11 एप्रिल ते 28 मे या दरम्यान उन्हाळी सुटी असणार आहे. शिक्षण विभागाने 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले असून, आता पुढील वर्षासाठी तयारी केली जात आहे.
मागीलवर्षी नियमित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. परंतु कलिका चेतरिके उपक्रम राबविण्यासाठी उशिराने अंमलबजावणी करण्यात आल्याने विद्यार्थी तसेच पालकही चिंतेत होते. त्यातच काही पुस्तकांमध्ये असणाऱ्या घटकांवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पाठ्यापुस्तकांची उपलब्धता करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.
यावर्षी मात्र असा गोंधळ होऊ नये यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नियोजन केले जात आहे. आतापर्यंत 95 टक्के सरकारी शाळांमध्ये पाठ्यापुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. मराठीसह उर्दू, कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही पाठ्यापुस्तके वितरित करण्यात आली आहेत.









