उन्हाच्या चटक्याने सुरू झाली काहिली : तापमान पोहोचले 36 अंशांवर
प्रतिनिधी / बेळगाव
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावात सध्या उष्णतेने काहूर माजविला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात सर्वसामान्य जनता हैराण होऊ लागली आहे. श्रीमंती थाट न परवडणाऱ्या सर्वसामान्यांच्या अंगाची काहिली होऊ लागली असून सध्या उष्णतेचा पारा 36 अंशांपर्यंत चढला आहे. मार्चअखेरच्या आठवड्यात निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक असून उन्हाचा तडाखा असाच वाढत गेल्यास आजारांची तीव्रता आणि पाण्याची टंचाई वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बेळगाव शहराचे तापमान समतोल होते. किमान 16 तर कमाल 30 अंश सेल्शीयसपर्यंतच्या तापमानाची नोंद आढळत होती. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही तापमानात तितकी वाढ नव्हती. यामुळे या महिन्यात उष्म्याचा तडाखा वाढला नव्हता. दिवसा ऊन असले तरी रात्रीच्या वेळी गारठा पसरत होता. यामुळे नागरिक निवांत झोप घेऊ शकत होते. मात्र, एकेक अंश सेल्शीयसने हा पारा वाढत गेल्यानंतर दिवसा आणि रात्रीही उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या उकाड्यामुळे सारे हैराण होताना दिसत आहेत. रात्रीच्यावेळीच्या थंडीही कमी झाली आहे. पहाटे थोडी थंडी आहे. मात्र काही वेळातच ही थंडी कमी होत असून सकाळी 8 नंतर उष्म्याला सुरूवात होताना दिसत आहे. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. त्यामुळे साऱ्यांनाचा सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. डांबरी रस्त्या ऐवजी अलिकडे काँक्रिटचे रस्ते करण्यात आले आहेत. त्यावरुन अनवाणी पायांनी चालताना चांगलेच चटके बसू लागले आहेत. काही ठिकाणी अर्धवट कामे आहेत. त्या ठिकाणांहून ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. त्यातच उन्हाचे चटके सहन करत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.
सर्वसाधारणपणे 15 मार्चनंतर या उकाड्यात वाढ होऊ लागली आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्शीयसपासून वाढत गेल्यानंतर उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात बसू लागल्या आहेत. 21 मार्चनंतर कमाल तापमान 36 अंश सेल्शीयसपर्यंत जाऊन ते कायम राहिल्यामुळे उकाड्याची तीव्रता न सोसणारीच ठरू लागली आहे. रात्रीच्या वेळी वाढत्या उष्म्यात डासांचे प्रमाण मोठे आहे. हे डास आणि उष्णता यातून सुटका करून घेण्यासाठी शहरी भागात पॅनची गरज भासू लागली आहे. यातच अचानकपणे अघोषित वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. विशेष करुन ग्रामीण भागांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी दीड ते दोनपर्यंत जागरण करून वाढत्या उष्म्याचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दिवसा तर उन्हाच्या वाढत जाणाऱ्या झळा जनजीवनच विस्कळीत करणाऱ्या ठरत आहेत. चौथा शनिवार असल्याने सरकारी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये सर्वत्र शुकशुकट पसरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसराबरोबरच इतर ठिकाणीही नागरिकांची वर्दळ कमी होती.
उन्हामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. दुपारनंतर तर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरू लागला असून बाजारहाटसाठी सायंकाळच्या वेळीत अधिक जण बाहेर पडताना दिसत आहेत. या उन्हामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेता तसेच इतर व्यवसायिकांना चटके सहन करावे लागत आहेत. याचबराब्sार वारंवार भाजींवर पाण्याचा शिडकावा करावा लागत आहे. सर्वसाधारण शिमगा सणानंतर उष्म्यात वाढ होत जाते. यावर्षीही आता उष्म्यामध्ये वाढ होताना दिसू लागली आहे.
दरवर्षी होळीच्या दरम्यान वळीवाचे आगमन होते. होळीच्या दरम्यान एक-दोन पाऊस पडतात. मात्र सध्या तरी अजूनपर्यंत जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र पाऊसाचा काही ठिकाणी केवळ शिडकावा झाला होता. पाऊस पडेल अशी शक्यता होती. मात्र अजून तरी पाऊस झाला नाही.
सध्या शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याचबराब्sार ग्रामीण भागामध्येही पाण्याच्या टंचाईला सारे जण सामोरे जात आहेत. लवकर पाऊस झाला नाही तर सर्वत्रच पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. सध्या जलाशयांमध्ये पाणी असले तरी पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. एकूणच उष्मा आणि पाणी टंचाईने जनता हैराण झाली आहे. याहूनही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.









