भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या आयपीएलच्या 16 व्या हंगामास सुऊवात झाल्याने पुढचे दोन महिने समस्त क्रिकेट धर्मियांसाठी उत्कंठेने भरलेले असतील. एकेकाळी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटपुरत्या सीमित असलेल्या क्रिकेटमध्ये टी-ट्वेंटी प्रकाराचा प्रवेश झाल्यापासून हा खेळ अधिक वेगवान झाल्याचे पहायला मिळते. पूर्वी 200 ही धावसंख्या एकदिवसीय सामन्यांमध्ये आव्हानात्मक समजली जात असे. किंबहुना आज टी-ट्वेंटीमध्ये 200 हून अधिक धावाही अगदी सहजगत्या केल्या जातात. यातून एकूणच या खेळाचा बदलता वेग ध्यानात यावा. अर्थात खेळाच्या या सुपरफास्ट प्रकाराला अधिक अष्टपैलूत्व वा बहुपैलूत्व मिळाले, ते आयपीएलमुळेच. एरवी परस्परांविरोधात त्वेषाने खेळणारे देशोदेशीचे खेळाडू मुंबई इडियन्स, चेन्नई सुपरकिंग वा तत्सम संघात एकत्र येतात काय, सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात काय आणि करंडक उंचावताना संमिश्रता वा विविधतेतून एकत्वाचा आविष्कार घडतो काय, हे सारेच अतर्क्य. तथापि, आयपीएलच्या महामेळ्यामध्ये हा योग जुळून येतो, हे विशेष होय. कोरोनामुळे मागची तीन वर्षे आयपीएलसाठी कसोटीची गेली असली, तरी आता आयपीएल पूर्वपदावर येणे, ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. पूर्वी त्या-त्या संघांचे सामने घरच्या मैदानावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळत असे. कोरोनाच्या दुष्टचक्रामुळे हे गणित बिघडल्याने त्यांना यापासून वंचित रहावे लागेल. परंतु, यंदा प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर सात सामने खेळू शकेल. ही संघाच्या समर्थकांसाठी पर्वणीच म्हणता येईल. या वर्षी 10 संघ, 52 दिवस अन् 70 सामने असा भरगच्च कार्यक्रम राहणार असून, 28 मेपर्यंत क्रिकेट रसिकांना मेजवानी चाखायला मिळेल. आयपीएल आणि नाविन्य हे समीकरण मानले जाते. नव्या हंगामाचे वैशिष्ट्या म्हणजे इम्पॅक्ट खेळाडू. हा नियम या वर्षीपासूनच लागू होत असून, या माध्यमातून प्रत्येक संघास बारा खेळाडूंसह मैदानात लढाई लढता येईल. क्रिकेट म्हणजे 11 खेळाडू, हा पूर्वापार नियम. त्याला यातून छेद दिला जात आहे. नाणेफेकीच्या वेळीच पाच राखीव खेळाडूंची निवड जाहीर करावी लागेल. त्यातीलच इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळविता येईल. फलंदाज बाद झाल्यावर किंवा फलंदाज षटकाच्या मध्यावर निवृत्त झाला, तरी इम्पॅक्ट खेळाडू मैदानात येऊ शकतो. अर्थात 11 पेक्षा अधिक जणांना फलंदाजी करता येणार नाही. या नियमाचा कोण किती खुबीने वापर करतो, हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल. त्याचबरोबर या नियमाचा एकूणच सामन्यांवर कसा इम्पॅक्ट पडणार, याचा निकालही रणसंग्रामातून लागू शकेल. मागील हंगामात पदार्पणातच गुजरात टायटन्सने विजेतेपदाला गवसणी घातली होती. कर्णधार हार्दिक पंड्याचे कुशल नेतृत्व, शुममन गिलचा फॉर्म, रशीद खानची हमखास बळी घेण्याची क्षमता, केन विल्यम्सनचा दर्जा, शमीची गोलंदाजी ही त्यांची बलस्थाने ठरू शकतात. जेतेपदासाठी कायमच पसंती दिल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सकडूनही अपेक्षा असतील. रोहित शर्माला फलंदाजीबरोबरच नेतृत्वाच्या पातळीवरही खरे उतरावे लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरलेल्या सूर्यकुमार यादवची फलंदाजी फुलणार का, इशान किशनची कामगिरी कशी राहणार, यावर त्यांची मदार असेल. जसप्रित बुमराहची अनुपस्थिती हा तसा संघासाठी मोठाच धक्का ठरतो. तथापि जोफ्रा आर्चरची गोलंदाजी हा त्यांच्याकरिता प्लस पॉईंट राहील. आर्चरचा वेगवान मारा बुमराहची पोकळी भरून काढण्यासाठी कितपत लाभदायक ठरणार, हे रणभूमीतच कळेल. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंगची नेहमीच स्टार संघात गणना होते. मागील स्पर्धेत या संघाची नवव्या क्रमांकापर्यंत घसरण झाली असली, तरी आजही त्याच्याइतका दुसरा वलयांकित संघ नसावा. याचे कारण धोनी नावाची जादू. 42 वर्षीय धोनी हा आजही सर्वांत अनुभवपक्व क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी नेहमीच सरस राहिलेली आहे. या हंगामात कर्णधारपदाबरोबरच फलंदाज म्हणून त्याचा मिडास टच पहायला मिळणार का, हे बघावे लागेल. ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, फॉर्मातील रवींद्र जडेजा, बेन स्टोक्स, मोइन अली अशी मजबूत फळी संघाकडे आहे. विक्रमी भाव मिळालेल्या मॅचविनर स्टोक्सची फलंदाजी प्रतिस्पर्ध्याला तडाखे देणार का, याचा आनंद घेण्यासाठीही चाहते आसुसले असतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरची भिस्त प्रामुख्याने कर्णधार फाफ डुप्लिसिस व विराट कोहली यांच्यावर असेल. स्टार खेळाडू असतानाही संघाला अद्याप जेतेपद पटकावता आलेली नाही. ही उणीव या वर्षी दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो. दिल्लीच्या नेतृत्वाची कमान डेव्हिड वॉर्नर, तर लखनऊ सुपर जायंट्सची धुरा लोकेश राहुलकडे आहे. दोघेही कसलेले फलंदाज आहेत. फलंदाजी व नेतृत्व या दोन्ही पातळ्यांवर त्यांचा कस लागेल. राजस्थान रॉयल संघात सध्या युवा खेळाडूंचा भरणा आहे. या सर्वांना बरोबर घेऊन संजू सॅमसन कुठवर मजल मारतो, याकडेही क्रिकेट वर्तुळाचे लक्ष राहील. हैदराबादही एडन मार्करम, भुवनेश्वर कुमार, हॅरी ब्रुक, उमरान मलिन अशी फौज असेल. श्रेयस अय्यरची दुखापत ही कोलकात्यासाठी धक्काच म्हणावी लागेल. त्याच्या अनुपस्थितीत नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल यांना कमान सांभाळावी लागेल. पंजाबचा संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली सॅम करण, शाहरूख खान, जॉनी बेअरस्टो, अर्शदीपसह मैदानात उतरेल. स्वाभाविकच यंदाची आयपीएल कोण गाजवणार, सर्वाधिक धावा, बळी कोण टिपणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आज मानवी जीवन अतिशय वेगवान बनले आहे. अशा धावपळीच्या काळात कसोटी वा एकदिवसीय क्रिकेट बॉल टू बॉल पाहणे शक्य होत नाही. हे पाहता क्रिकेटप्रेमींकरिता टी-ट्वेंटी हा एक सहजशक्य पर्याय ठरतो. अटीतटीच्या सामन्यांमुळे अनेकदा सनसनाटी निकाल लागतात. कसोटीसारखा क्लास नसला, तरी चित्तथरारकतेत हा प्रकार कुठेही कमी नाही. त्यामुळे ‘आयपीएलची धूम’ हा यंदाही आनंददायीच अनुभव असेल.
Previous Articleसोळाव्या आयपीएलचे दिमाखदार उद्घाटन
Next Article नवज्योत सिद्धू आज कारागृहातून सुटणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.