प्रतिनिधी / बेळगाव
श्री राम जय राम जय जय रामचा नामघोष आणि राम जन्मला ग सखे राम जन्मला या गीताच्या पार्श्वभूमीवर राम जन्मोत्सव करुन शहर परिसरात श्री राम नवमी मोठ्या भक्तीभवाने साजरी करण्यात आली. शहरातील व उपनगरांतील सर्व श्रीराम मंदिरांमध्ये भक्तांनी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत गर्दी करुन श्रीरामाचे दर्शन घेतले. लोकमान्य श्री राम मंदिर, आचार्य गल्ली, शहापूर येथील पुरातन राम मंदिरात राम नवमीचा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. गुरूवार दि. 30 रोजी सकाळी 8 वाजता लोकमान्य सोसायटीचे संचालक सुबोध गावडे व सरिता गावडे यांच्या हस्ते नित्य अभिषेक व पूजा झाली.
सकाळी 9 वाजता खासबाग जीवन विद्या मिशनच्यावतीने हरिपाठ, 10 वाजता राम जन्मोत्सवावर ह.भ.पं. यल्लाप्पा पाटील यांचे कीर्तन झाले. 12 वाजता खासबाग, शहापूर महिला मंडळातर्फे राम जन्मोत्सवाचा पाळणा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता महाप्रसादला प्रारंभ झाला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महेश ग्रामोपाध्ये व चिदंबर ग्रामोपाध्ये यांनी पौरोहित्य केले.
रामदेव गल्ली येथील श्रीराम मंदिर
येथील श्रीराम मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच लक्षणीय गर्दी केली. सकाळी नित्य पूजा व अभिषेक होऊन दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा झाला. त्यानतंर भजन आणि कीर्तन होऊन तीर्थ प्रसादाचे वितरण करण्यात आले. सकाळी प्रमोद दप्तरदार यांनी पूजा केली. त्यानंतर अशोक कित्तूर यांनी राम जन्म सोहळ्याचे पौरोहित्य केले.

इस्कॉन
इस्कॉन मंदिरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त दि. 28 व 29 रोजी श्रीराम कथा सादर झाली व त्यानंतर प्रसाद वितरण झाले. दि. 30 रोजी सकाळी 7.45 वाजता श्रीमत भागवतावर प्रवचन झाले. संध्याकाळी 6.30 वाजता रामकथा सांगण्यात आली. प.पू. अनंतप़ृष्ण गोस्वामी महाराज यांनी रामकथा सांगितली. याप्रसंगी अनेक रामभक्त कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित होते. रात्री महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
बिच्चु गल्ली, श्रीराम मंदिर
येथील श्रीराम मंदिरामध्ये राम नवमीनिमित्त सकाळी 8 वाजता पंचांमृत महाभिषेक, दुपारी 12 वाजता राम जन्म व त्यानतंर तीर्थप्रसाद वाटप झाले. सायंकाळी 5 ते 6 यावेळेत योग महिला मंडळातर्फे भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम झाले. त्यानंतर रामनाम जप, राम रक्षा पठण होऊन 9 वाजता आरती आणि मंत्रपुष्प होऊन सांगता झाली.

कुरबर गल्ली, अनगोळ
कुरबर गल्ली, अनगोळ येथे जय अमर शिवाजी युवक मंडळातर्फे बुधवारी श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली. अनगोळ नाका ते कुरबर गल्लीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गुरूवारी सकाळी हरिगुरू महाराज यांच्या उपस्थितीत पूजा होऊन रथपूजन करण्यात आले. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. राम जन्मोत्सव झाल्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. शुक्रवारी महाआरती होणार असून दि. 1 एप्रिल रोजी महाप्रसाद होणार आहे.









