सावरकर यांच्यावरुन महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण तापते आहे. नुकतीच राहूल गांधींची खासदारकी रद्द झाली. त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि दिल्लीतील सरकारी घर सोडण्यास सांगण्यात आले. त्यामागेही आगा-पिछा न बघता, कायदा न अभ्यासता केलेली बेछूट विधाने आणि एखाद्या समाजाला, जातीला चोर म्हणणे अंगलट आले आहे. राहूल गांधीच नव्हे वेगवेगळय़ा पक्षातील धरबंद नसलेले बेछूट वाचाळवीर ‘फायरब्रँड’ या नावाखाली असभ्य, अस्थायी आणि अकारण बडबडत असतात. या वाचाळवीरांमुळे ते, त्यांचा पक्ष व पक्षनेतृत्व अडचणीत येते. पण ‘टवाळा आवडे विनोद’ या उक्तीप्रमाणे संबंधित दुर्लक्ष करीत असतात. मुळात राहूल गांधी हे गांधी आहेत का? गांधी आडनाव का व कसे इथपर्यंत प्रश्न त्यांचे राजकीय विरोधक विचारत आहेत. अशावेळी माफी मागायला मी सावरकर नाही, मी गांधी आहे. गांधी कधीही माफी मागत नाहीत, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ते लक्ष्य करत आहेत. त्यांचा माफीवीर असा उल्लेख करुन राहूल गांधी पुन्हा-पुन्हा आपले आरोप अधोरेखित करत आहेत. राहूल गांधींचे हे आरोप महाराष्ट्रात त्यांचे मित्र असणाऱया शिवसेनेला अडचणीत आणत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षाची आघाडी टिकते की विस्कटते अशी वेळ आली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई, मराठी भाषा, मराठी माणसांचा न्याय हक्क, भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्व या मुद्यांवर शिवसेनेची उभारणी केली. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना अनेक वर्षे युती होती पण मुख्यमंत्रीपदाचा मोह आणि भाजपा बरोबरच्या कुरबुरी यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक निकालाची आकडेवारी बघून कमळाबाईशी काडीमोड घेतला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी मैत्री करत महाआघाडीचे राज्य स्थापित केले. अडीच वर्षे सत्ता होती तोपर्यत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे सहन केले. प्रसंगी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर होणारे आघात पचवले पण आता सत्ताही नाही आणि तेच आघात पुन्हा-पुन्हा, या पार्श्वभूमिवर तोंड उघडून त्यांनी सावरकर आमचे दैवत आहे. स्वातंत्र्यवीरांवरची टीका सहन करणार नाही असे स्पष्ट केले. तेलही गेले, तूपही गेले हाती धुपाटणे आले अशी अवस्था होऊ नये म्हणून सत्ता गेल्यावर सुचलेले शहाणपण असे त्याला म्हणावे लागेल. शरद पवार यांनी दिल्लीत भाजपा विरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा चंग बांधून बैठका मागून बैठका सुरु केल्या आहेत. भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व कुणी करायचे यावरुनही वाद आहेत. शरद पवार गेली अनेक वर्षे पंतप्रधानपदावर डोळे ठेऊन आहेत. शिवसेनेने उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात असे म्हटले होते. ममता बॅनर्जी, नितीशकुमार असे अनेक आहेत. ही मोट बांधणे, टिकवणे सोपे नाही. पण फोडाफोडी व जुळवाजुळवीत तरबेज असणारे शरद पवार भाजपातील काहींना गोंजारत, शिवसेनेतील काहींना हाताळत आप पासून भाकप, माकपपर्यंत सर्वांना गोंजारताना दिसत आहेत. त्यामागे जे राजकारण आहे ते दडून राहिलेले नाही. सावरकर हे अनेक अर्थांनी मोठे होते. साहित्यिक, कवी, विद्वान, देशभक्ती, स्वार्थत्याग, विज्ञानवादी, वक्ता, विचारवंत, नाटककार, शाहीर, लढवय्या, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, काळय़ा पाण्याची शिक्षा व जन्मठेप भोगणारे भारतमातेचे सुपुत्र अशा अनेक अंगांनी अद्वितीय होते. खरेतर त्यांना भारतरत्न म्हणायला हवे. महाराष्ट्रातील या स्वातंत्र्यवीराने आपले सारे पुटुंब स्वातंत्र्यलढय़ात उतरवून हालअपेष्टा भोगल्या. सावरकरांविषयी सर्वांना आदर व प्रेम आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना तर हे पेम विशेष हेते. काँग्रेस नेते मणीशंकर यांनी सावरकरांबद्दल अपशब्द काढले तेव्हा शिवसेनेने जोडेमार आंदोलन पेले होते. पण राहूल गांधी वारंवार सावरकरांना लक्ष्य करत, अवमानित करत आहेत. राहूल गांधींनी आजवर माफी मागितलेली नाही असे नाही. त्यांनी संसदेतील कागदपत्रे फाडली तेव्हा माफी मागितली होती. प्रश्न वाचाळवीरतेचा, एखाद्या समाजाचा, जातीचा अवमान करण्याचा होता. महाराष्ट्रात काही जातींना असेच लक्ष्य करुन पोळी भाजली जाते. पण त्याविरोधी कोर्टात कुणी गेले नाही म्हणून संबंधितांचे फावले आहे. विविध पक्षांच्या वाचाळवीरांना महाराष्ट्र कंटाळला आहे. सावरकरांचा अवमान महाआघाडीला अडचणीला आणू शकतो हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी मध्यस्थी सुरु केली आहे. पण तो विषय आता राजकीय बनला आहे. भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी राज्यभर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करुन हा मुद्दा तापवणार हे स्पष्ट केले आहे. मागे अजित पवारांनी धरणातील पाण्याबाबत केलेले विधान टिकेचे लक्ष्य बनले तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीजवळ दिवसभर मौन पाळून पश्चाताप केला होता. अजितदादांचा हा धडा काँग्रेस राबवण्याची सुतराम शक्यता नाही. ओघानेच हा मुद्दा व सावरकर गौरव यात्रा गाजणार आणि काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची कोंडी केली जाणार हे स्पष्ट आहे. राहूल गांधींना मोदी अडनावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या टिकेबद्दल कोर्टाने शिक्षा दिली आता सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहूल गांधी यांनी माफी मागावी,अशी मागणी केली आहे. ‘मी माफी मागणार नाही’ हीच राहूल गांधींची घोषणा आहे. ओघानेच या मुद्दय़ावरुन सावरकर न्यायालयाची दारे ठोठावतील हे स्पष्ट आहे. बेताल, बेछूट विधाने आणि इतिहासातील अर्धसत्य जाणून राजकीय,जातीय पोळी भाजून घेण्याचे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन देशाला, लोकशाहीला आणि सामाजिक एकतेला शोभादायक नाही. असे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत आणि जात, धर्म आणि पुराणातील वांगी काढून कुणी स्वार्थ साधत असेल तर भारतीय मतदारांनी त्यांना धडा शिकवला पाहिजे. जातीय व्होट बँक तयार करणाऱया सर्वांना कायद्याने चाप लावता आला नाही तर मतदारांनी अशा प्रवृत्तींना मतपेटीतून धडा शिकवला पाहिजे. याबाबत सुधारणा गरजेची आहे. सावरकर गौरव यात्रा, लवकरच अपेक्षित असलेला सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि कोंडीत सापडलेली शिवसेना व काँग्रेस कोंडी फोडण्यासाठी करणार असलेली धडपड यामुळे महाराष्ट्राचे वातावरण तापणार आहे. लोकांनी ते समजून घेतले पाहिजे आणि त्यावर महाराष्ट्रहित, देशहित, लोकहित लक्षात घेऊन मात्रा शोधली पाहिजे.
Previous Articleएससीओ बैठकीला पाक-चीनची उपस्थिती?
Next Article शरणागतीसाठी अमृतपालकडून अटी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








