कर्नाटक विधानसभाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये एकूण 224 जागांसाठी निवडणुक होईल. या निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी कर्नाटक सारख्या महत्वाच्या राज्याची निवडणुक ही लोकसभेच्या निवडणुकीची झलक मानली जात आहे.
एकूण 224 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या कर्नाटक निवडणूक निवडणूकीसाठी २९ मार्चपासून आचारसंहिता लागू होणार असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी सांगितले. एकूण 224 जागांपैकी 36 अनुसूचित जाती आणि 15 अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.
कर्नाटक राज्यातील एकूण 5, 21, 73, 579 मतदार असून त्यात पुरुष मतदार 2 कोटी 62 लाख असून महिला मतदारांची संख्या 2 कोटी 59 लाख आहे. दिव्यांग व्यक्तींची संख्या (पीडब्ल्यूडी) 5. 55 लाख असून यात मागिल पाच वर्षात जवळपास 150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018- 19 नंतर पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच मतदारांची संख्या 9.17 लाखांनी वाढली आहे..
काँग्रेसने 25 मार्च रोजी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे ‘वरुणा’मधून तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
आम आदमी पक्षानेही कर्नाटक निवडणूक एंट्री केली आहे. 20 मार्च रोजी आपल्या 80 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर करताना राज्यातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.