स्व-सहाय्य संघाच्या महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : स्व सहाय्य संघाच्या महिला सदस्यांना बाल कल्याण विभागाच्यावतीने आर्थिक सहाय्यधन मंजूर झाले होते. मात्र ते सहाय्यधन एका अंगणवाडी शिक्षिकेने परस्पर लाटले असून या प्रकारामुळे खळबळ उडाली. त्यानंतर अगसगे येथील स्व सहाय्य संघाच्या महिला सदस्यांनी त्या अंगणवाडी शिक्षिकेच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्या महिलेवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दलित महिलांचे शोषण करणाऱ्या त्या अंगणवाडी शिक्षिकेला कामावरूनही कमी करावे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या महिलेची नियुक्ती करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. अगसगे येथील आंबेडकर अभिवृद्धी स्व सहाय्य संघ, रामा स्व सहाय्य संघ, अक्कमहादेवी स्व सहाय्य संघ, रमाबाई आंबेडकर स्व सहाय्य संघाच्या अध्यक्षा, पदाधिकारी व सदस्य महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये मंजूर झाले होते. या स्व सहाय्य संघातील 40 महिलांना 4 लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र अंगणवाडी क्रमांक 224 च्या अंगणवाडी शिक्षिका रेखा पाटील यांनी हा संपूर्ण निधी परस्पर लाटल्याचा आरोप निवेदनात केला आहे. एकप्रकारे मोठी फसवणूक केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि त्या अंगणवाडी शिक्षिकेवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. सदर शिक्षिकेवर दलितांना असलेल्या कायद्यांतर्गत कारवाई करावी. अन्यथा त्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील दिला आहे. यावेळी दलित नेते शिवपुत्र मेत्री, सेपवाड समुहाचे अध्यक्ष संतोष मेत्री, यल्लाप्पा मेत्री, अप्पय्या कोलकार, सन्नाप्पा कोलकार, सरोजा कोलकार, वंदना मुतगेकर, भाग्यश्री कोलकार, कांचन मेत्री, ईरव्वा मेत्री, सत्यव्वा मेत्री, लक्ष्मी मेत्री, आश्विनी मेत्री, रुपा कोलकार, महादेवी मेत्री, कल्याणी मेत्री, सुगंधा मेत्री व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









