जायंट्स सखीतर्फे केली होती जागा उपलब्ध करण्याची मागणी : पे अॅण्ड यूज तत्त्वावर स्वच्छतागृहे सुरू करणार
बेळगाव : शहरात स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने मोठी अडचण भासत असते. त्यामुळे शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जायंट्स सखीतर्फे करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिकेच्या अभियंत्यांनी जागेबाबत चर्चा केली. बाजारपेठेत दोन ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने कुचंबणा होत असते. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह उभारण्याचा जायंट्स सखीचा प्रस्ताव आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतर करा, या तत्त्वावर स्वच्छता गृहाकरिता नरगुंदकर भावे चौक, धर्मवीर संभाजी चौक, भाजी मार्केट अशा विविध परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती.
महापालिकेने देखील दर्शविली तयारी
महापालिका आयुक्तांना याबाबत जायंट्स सखीच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. सदर निवेदनाची दखल घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली आहे. य् ााबाबत चर्चा करण्याकरिता सोमवारी सकाळी कोनवाळ गल्ली येथील विभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जायंट्स सखीच्या ज्योती अनगोळकर व पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती आणि महापालिकेचे साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांनी जागेबाबत चर्चा केली. महिला आणि नागरिकांसाठी कोणती जागा योग्य आहे याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. महापालिका आयुक्तांची परवानगी घेऊन जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुसज्ज स्वच्छतागृहाची उभारणी करून ‘पे अॅण्ड यूज तत्त्वावर स्वच्छतागृहे’ सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत महापालिकेने देखील तयारी दर्शविली आहे. येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. य् ाावेळी संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, सचिव सुलक्षणा शिनोळकर, वैशाली भातकांडे, अपर्णा पाटील, शीला खटावकर, सुवर्णा काळे, वृशाली मोरे, अर्चना कंग्राळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.









