वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
हर हर महादेवच्या जयघोषात अलतगे गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थानच्या इंगळ्यांचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांनी इंगळ्यामधून पळून आपला नवस फेडला.
ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग देवस्थानची यात्रा प्रत्येकवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात व मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात येते. गावातील भाविक गुरुवारी सकाळी सजविलेल्या बैलगाड्यातून शिवारातील ओली लाकडे आणतात. सर्व बैलगाड्या गावाकडे आल्यावर गावभर लाकडे भरलेल्या सर्व बैलगाड्यांची मिरवणूक काढून दुपारी 12 वाजता मंदिरासमोर सर्व लाकडे पुजाऱ्यांच्या हस्ते पूजन करून पेटवितात. सायंकाळी ब्रह्मलिंग देवस्थानच्या पुजाऱ्यांच्या हस्ते इंगळ्यांची विधिवत पूजा केल्यावर नवस फेडणारे भाविक इंगळ्यातून पळून ब्रह्मलिंग देवस्थानचे दर्शन घेतात.
नवस फेडणारे भाविक गुरुवारी संपूर्ण दिवस कडक उपवास करतात. रात्री सर्व भाविकांच्या घरी गोड प्रसाद असतो.









