वृत्तसंस्था/ बेसिल (स्वीस)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर सीरीज-300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत उपांत्यफेरी गाठताना डेन्मार्कच्या बे आणि मॉलहिदे यांचा पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी डेन्मार्कच्या जिपे बे आणि लेसी मॉलहिदे यांचा 54 मिनिटांच्या कालावधीत 15-21, 21-11, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले आहे. आता सात्विक आणि चिराग यांचा उपांत्यफेरीचा सामना मलेशियाच्या आँग सीन व तेओ यी यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांचे आव्हान यापूर्वीच समाप्त झाले आहे. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला गेल्या महिन्यात झालेल्या अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत सुरुवातीच्याच फेरीत हार पत्करावी लागली होती.









