इसाबेली वाँगची शानदार हॅट्ट्रिक, युपी वॉरियर्स 72 धावांनी पराभूत
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या पहिल्या टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या एलिमिनेटर सामन्यात इसाबेली वाँगच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर मुंबई इंडियन्सने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना युपी वॉरियर्सचा 72 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या नॅट स्किव्हेर ब्रंटला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली होती. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 4 बाद 182 धावा जमवित युपी वॉरियर्सला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अचूक गोलंदाजीसमोर युपी वॉरियर्सचा डाव 17.4 षटकात 110 धावात आटोपला.
मुंबईच्या डावामध्ये नॅट स्किव्हेर ब्रंटने 38 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 72 तर यास्तिका भाटियाने 18 चेंडूत 4 चौकारांसह 21, मॅथ्यूजने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, कर्णधार कौरने 15 चेंडूत 1 चौकारासह 14, अॅमेलिया केरने 19 चेंडूत 5 चौकारांसह 29 तर पूजा वस्त्रकरने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 11 धावा फटकावल्या. युपी वॉरियर्सतर्फे अंजली सर्वानी आणि पी. चोप्रा यांनी प्रत्येकी 1 तर इक्लेस्टोनने 39 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इसाबेली वाँगच्या भेदक गोलंदाजीसमोर युपी वॉरियर्सच्या डावाला दुसऱ्या षटकापासूनच गळती लागली. इसाकने सेहरावतला एका धावेवर झेलबाद केले. त्यानंतर वाँगने कर्णधार हिलीला कौरकडे झेल देण्यास भाग पाडले. तिने 6 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. ताहिला मॅकग्रा धावचीत झाली. तिने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. किरण नवगिरेने एकाकी लढत देत 27 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 43 तर ग्रेस हॅरिसने 12 चेंडूत 3 चौकारांसह 14, दीप्ती शर्माने 20 चेंडूत 3 चौकारांसह 16 धावा जमविल्या. पॉवरप्ले अखेर युपी वॉरियर्सची स्थिती 3 बाद 46 अशी होती. नवगिरे आणि हॅरिस यांनी चौथ्या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी केली. ही जोडी डावातील आठव्या षटकात नॅट स्किव्हेर ब्रंटने फोडली. मुंबई इंडियन्सच्या वाँगने आपल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नवगिरेला ब्रंटकरवी झेलबाद केले. त्यानंतर वाँगने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सिमरन शेखचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर वाँगने इक्लेस्टोनचा शून्यावर त्रिफळा उडवून आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. युपी वॉरियर्सच्या तळाच्या फलंदाजांना मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी झटपट गुंडाळले. 17.4 षटकात त्यांचा डाव 110 धावात आटोपला. युपी वॉरियर्सच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे वाँगने 15 धावात 4, इसाकने 24 धावात 2, नॅट स्किव्हेर ब्रंट, मॅथ्यूज आणि कलिता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स 20 षटकात 4 बाद 182 (नॅट स्किव्हेर ब्रंट नाबाद 72, यास्तिका भाटिया 21, मॅथ्यूज 26, कौर 14, अॅमेलिया केर 29, पूजा वस्त्रकर नाबाद 11, अवांतर 9, इक्लेस्टोन 2-39, सर्वानी 1-17, चोप्रा 1-25), युपी वॉरियर्स 17.4 षटकात सर्वबाद 110 (नवगिरे 43, हिली 11, हॅरिस 14, दीप्ती शर्मा 16, इसाबेली वाँग 4-15, इसाक 2-24, नॅट स्किव्हेर ब्रंट, मॅथ्यूज, कलिता प्रत्येकी 1 बळी).









