लँड फॉर जॉब घोटाळ्याशी संबंधित प्रकरण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘लँड फॉर जॉब्स’ घोटाळ्याप्रकरणी लालू कुटुंबीयांच्या अडचणी वाढत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सीबीआय कार्यालयात शनिवारी चौकशी करण्यात आली. या प्रकरणात ईडी लालूंची कन्या मिसा हिची चौकशी करत आहे. हे प्रकरण रेल्वेतील नोकरीसाठी भूखंड वाटप करण्याशी संबंधित आहे. 2004 ते 2009 या काळात लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वे मंत्री होते. त्यांनी रेल्वेमंत्री असताना जमीन भूखंड हस्तांतरणाच्या बदल्यात कुटुंबाला रेल्वेत नोकऱ्या दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी तेजस्वी यादव शनिवारी सकाळी 11.30 वाजता सीबीआय कार्यालयात पोहोचले. सकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीत तीन तास चौकशी झाली होती. अडीच वाजेपर्यंत अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. मग दुपारच्या जेवणासाठी घरी पाठविण्यात आले. दुपारच्या जेवणानंतर ते पुन्हा साडेतीन वाजता कार्यालयात पोहोचल्यानंतर पुन्हा चौकशी करण्यास प्रारंभ झाला होता. आम्ही तपास यंत्रणांना नेहमीच सहकार्य केले आहे. आजकाल देशातील वातावरण तुम्ही पाहत आहात. नतमस्तक होणे खूप सोपे आहे. लढणे खूप कठीण आहे. आम्ही लढू आणि जिंकू, असे सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी तेजस्वी यादव प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
तेजस्वी यादव यांची दिल्लीतील सीबीआय कार्यालयात चौकशी केली जात आहे. सीबीआयने त्यांना यापूर्वी तीनवेळा समन्स बजावले होते. मात्र आपली पत्नी उपचाराधीन असल्याचे सांगत त्यांनी चौकशी लांबणीवर टाकली होती. तेजस्वी यांनी सीबीआयचे समन्स रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने तेजस्वीला 28 फेब्रुवारी, 4 मार्च आणि 11 मार्च रोजी समन्स बजावले होते. मात्र, सीबीआयचे समन्स रद्द करण्याची उपमुख्यमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. याचदरम्यान सीबीआयने न्यायालयात तेजस्वी यादव यांना तूर्तास अटक करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सीबीआय अधिकारी सुऊवातीला काही कागदपत्रे दाखवून तेजस्वी यादव यांची पुष्टी करेल. सदर कागदपत्रे नोकरीसाठी जमीन प्रकरणाशी संबंधित असल्याचे सीबीआयने सांगितले होते. त्यानुसार आता तेजस्वी यादव यांची सीबीआयकडून चौकशी सुरू झालेली आहे. या प्रकरणात यापूर्वी लालूंच्या पत्नी राबडीदेवी यांची सीबीआयने निवासस्थानी भेट देत चौकशी केली होती.









