अटल सेतू बंदी 5 एप्रिलपर्यंत वाढवा : जीएसआयडीसीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पणजी : अटल सेतू पुलावरील दुऊस्ती काम पूर्ण करण्यासाठी पुलाची बंदी 5 एप्रिलपर्यंत वाढवून देण्याची मागणी गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) उत्तर गोवा जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस व पर्वरी पोलीस स्टेशन यांच्याकडे पत्रातून केली आहे. ती मागणी मान्य झाल्यास पर्वरी ते पणजीपर्यंत होणारी सध्याची वाहतूक कोंडी दि. 5 एप्रिलपर्यंत वाढणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. उत्तर गोव्यातून पणजी – मडगांव – वास्को व दक्षिण गोव्यापर्यंत प्रवास करणाऱ्यांचे त्रास आणखी 10 दिवस तरी वाढणार असल्याची शक्यता समोर आली आहे. परिणामी आणखी अनेक दिवस वाहतूक कोंडीशी सामना करण्याची पाळी दुचाकी – चारचाकी वाहनचालकांवर येणार असल्याचे दिसून येते.
अटलसेतूची एकतरी लेन सुरु करावी : वाहतूक पोलीस
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ही कोंडी लवकरात लवकर सुटावी म्हणून अटल सेतूची एक तरी लेन सुऊ करावी अशी मागणी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मामू हागे यावर काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. आधी ठरल्याप्रमाणे अटल सेतू बंदीची मुदत सोमवार दि. 27 मार्चपर्यंतच असून तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी जारी केला आहे.
आमदार, मंत्री, अधिकारी अडकणार कोंडीत
मुख्य म्हणजे त्याच दिवसापासून राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुऊ होणार असून पर्वरीचे विधानसभा संकूल याच वाहतूक कोंडीच्या मार्गावर असल्यामुळे मंत्री, आमदार व इतर महनीय व्यक्ती त्या कोंडीत अडकून पडणार आहेत. अधिवेशन 31 मार्चपर्यंत म्हणजे आठवडाभर चालणार असून गुऊवारी 30 मार्च रोजी एक दिवस अधिवेशनाला सुट्टी आहे. त्यामुळे अटल सेतू बंदी वाढवली तर त्याचा फटका महनीय व्यक्तींना बसणार आहे.
आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात त्यावरच वाहतूक कोंडीचे व वाहन चालकांचे भवितव्य अवलंबून आहे. वाहन चालकांचे ऐकावे की सरकारचे असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर असून त्यांची कसोटी लागणार आहे. दरम्यान, पर्वरी ते पणजी वाहतूक कोंडीची समस्या कायम असून त्यापासून वाहनचालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. ऊग्णवाहिकादेखील त्या कोंडीत अडकून पडत असून त्याचा फटका ऊग्णांना बसत असल्याचे समोर आले आहे.









