महागाईत भर ; सर्वसामान्यांना फटका
बेळगाव : बाजारात केळी आणि लिंबूच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अधिक दराचा फटका सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे केळी आणि लिंबूसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. केळ्यांचा दर डझनामागे 20 रुपयांनी वाढला आहे. साधारण 70 ते 80 रुपये डझन केळी झाली आहेत. त्याचबरोबर लिंबूच्या दरात वाढ झाली असून 8 ते 10 रुपयाला एक लिंबू अशी विक्री होऊ लागली आहे. वाढत्या उन्हामुळे केळी आणि लिंबूची मागणी वाढली असली तरी दराचा चटका सहन करावा लागत आहे. उन्हाच्या झळांमुळे फळांना आणि लिंबूला पसंती दिली जाते. मात्र दरात भरमसाट वाढ झाल्याने सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यातच केळी, लिंबू आणि इतर पदार्थांचे दर वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. य् ाात्रा-जत्रा आणि लग्नसराईला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे केळी आणि लिंबूची मागणी वाढली आहे. मात्र दर भडकल्याने नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. वादळी पावसामुळे काही ठिकाणी केळीच्या बागांना फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. परिणामी आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती दिली जात आहे. वाढत्या उष्म्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. विशेषत: लिंबूसोडा, लिंबू सरबत आदींना मागणी वाढत असल्याने लिंबूचे दर वाढले आहेत.









