रेडिओऍक्टिव्ह त्सुनामी घडवून आणण्याची क्षमता
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांनंतर आता अंडरवॉटर न्युक्लियर ड्रोनचे परीक्षण सुरू केले आहे. यासंबंधीची माहिती तेथील वृत्तसंस्था केसीएनएने दिली आहे. उत्तर कोरियाने तयार केलेला न्युक्लियर ड्रोन रेडिओऍक्टिव्ह त्सुनामी आणण्यासह अन्य देशांच्या बंदरांना नष्ट करण्याची क्षमता बाळगून असल्याचे समजते.
21-23 मार्चदरम्यान झालेल्या न्युक्लियर ड्रोनच्या परीक्षणाची पाहणी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किंम जोंग उननेच केली आहे. न्युक्लियर ड्रोनला डागण्यापूर्वी तो दक्षिण हमयोंग प्रांतानजीक समुद्रात 260 ते 490 फूट खाली 59 तासापर्यंत ठेवण्यात आला होता.
‘हाइल’ नाव
उत्तर कोरियाने स्वतःच्या नव्या अंडरवॉटर न्युक्लियर ड्रोनला ‘हाइल’ नाव दिले आहे. याचा कोरियन भाषेतील अर्थ ‘त्सुनामी’ असा होतो. हा रेडिओऍक्टिव्ह ड्रोन कुठल्याही बंदरावर सहजपणे तैनात करता येऊ शकतो. हा ड्रोन 2012 पासून तयार केला जात होता. मागील दोन वर्षांमध्ये याच्याशी निगडित 50 परीक्षणं करण्यात आली आहेत. हा ड्रोन अमेरिका आणि दक्षिण कोरियाला आमचा इशारा देणारा आहे. उत्तर कोरिया स्वतःच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे या दोन्ही देशांना कळणे गरजेचे असल्याचे किम यांनी परीक्षणानंतर म्हटले आहे.
अमेरिका-दक्षिण कोरियाचा सैन्याभ्यास
उत्तर कोरियाने मार्च महिन्यात आतापर्यंत 6 क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. बुधवारीच 4 क्रूज क्षेपणास्त्रांचे परीक्षण करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमागे दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त सैन्याभ्यासाची पार्श्वभूमी आहे. हा संयुक्त सैन्याभ्यास 5 वर्षांनी आयोजित झाला होता. उत्तर कोरिया या सैन्याभ्यासाला चिथावणीपूर्ण कृत्य ठरवत आहे.









