प्रतिनिधी / पणजी
कासारवर्णे येथील सातेरी महादेव देवस्थानचा कळस एक तपानंतर कासारवर्णे गावातील प्रत्येकाच्या घरात पोचला आहे. देवस्थान समितीच्या हट्टी आणि नाहक अटीना न जुमानता गावातील काही महाजनांनी पुढाकार घेऊन पुन्हा गावाची एकी करण्याचे महान कार्य केले आहे. पेडणे मामलेदारांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली असल्याने लोकांनी त्यांना आभार मानले आहे.
शिमगोत्सवाच्या काळात लोकांना आशीर्वाद देण्यासाठी सातेरी महादेव देवस्थानचा कळस घराघरात फिरवला जात होता. गेल्या शेकडो वर्षापासूनची ही प्रथा होती. मध्यंतरी गावात विविध कारणावरून दुफळी निर्माण झाली. गावात देवस्थान समितीचे वर्चस्व असल्याने लोकही त्यांच्या निर्णयाला बळी पडत होते. गावातील दोन वाड्यावरील लोकांच्या घरात शिमगोत्सवातील कळस नेणे बंद करण्यात आले होते. याचा परिणाम गावातील विविध उत्सवांवर तसेच देवस्थानच्या इतर कामातही होत असल्याचे दिसू लागले होते. गावात दुफळी निर्माण झाली होती.
या सगळ्या प्रकारातून मार्ग काढून गावात एकी निर्माण करण्याचे महाजनांनी ठरविले होते. त्यासाठी पहिले कार्य म्हणून शिमगोत्सवातील देवाचा कळस प्रत्येकाच्या घराघरात नेण्याचे ठरविले आणि त्याबाबत देवस्थान समितीला कळविले होते. मात्र देवस्थान समिती आपल्या हट्टी स्वभावावर ठाम होते त्यांनी कळस नेणे नकारले होते. महाजनांनी या बाबत ठोस पाऊले उचलून या बाबत पेडणे मामलेदारांकडे तक्रार दाखल केली होती. मामलेदारांनी याबाबत निर्णय देताना म्हटले होते की देवस्थांचा कळस प्रत्येकाच्या घरात पोहचायला हवा कुणालाही टाळता येणार नसून त्यासाठी पाहिजे असल्यास पोलीस संरक्षण घेता येईल.
20 व 21 मार्च रोजी कळस फिरण्याचे दिवस होते त्या दिवशी देवस्थानच्या समितीने त्या दोन वाड्यावर कळस नेणे नाकारले होते. यावेळी पोलीसही उपस्थित होते. मात्र समिती मामलेदारांचा आदेश मानायला तयार नव्हते अखेर काही महाजनांनी देवाचा कळस आपल्या ताब्यात घेतला आणि त्या दोन वाड्यावरील प्रत्येक घरात नेला. लोकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि देवाचा आशीर्वाद घेतला. कासारवर्णे गावात पुन्हा एकजूट निर्माण करण्याचे काम महाजनांनी केले आहे.









