रत्नागिरी / प्रतिनिधी :
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खूनाचा आरोप असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या जामीन अर्ज प्रकरणात एका मंत्र्याची व्हिडीओ क्लिप न्यायालयापुढे सादर करण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना या मंत्र्याने खूनाचे 302 कलम लावण्यासंदर्भात विधान केले होते. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात मंत्र्याची क्लिप न्यायालयापुढे सादर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता 28 मार्च रोजी होणार आहे.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ डी बिले यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे. पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खूनाचे पडसाद संपूर्ण राज्य तसेच देशभरात उमटले होते. समाजाच्या सर्वच स्थरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता. याचवेळी राजकीय वातावरण तापू लागल्याने मंत्र्याने माध्यमांशी बोलताना भादंवि कलम 302 कलम लावण्यासंदर्भात विधान केले होते. हीच क्लिप न्यायालयापुढे सादर करण्यात आली आहे. आंबेरकर याचे राजकीय नेत्यांची असलेल्या संबंधामुळे सर्वांचेच लक्ष आंबेरकर याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीकडे लागून राहिले आहे.
पत्रकार शशिकांत वारिशे हा राजापूरातील बारसु सोलगांव येथे होवू घातलेल्या रिफायनरी विरोधात भूमिका मांडत होत़ा तर आरोपी आंबेरकर हा स्वतला रिफायनरी समर्थक असल्याचे सांगत होत़ा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर 6 फेबुवारी 2023 रोजी राजापूरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा थार गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होत़ा. घटनेच्या दिवशी पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयित आरोपी याच्याविरूद्ध दाखल केला होत़ा. मात्र, पोलिसांच्या तपासामध्ये हा पूर्वनियोजित खून असल्याचे तपासात समोर आल़े. त्यानुसार पेलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली होत़ी.
पंढरीनाथ याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार राजापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल़ा तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. अपघातामधील थार गाडी ही पंढरीनाथ आंबेरकर याचे नावावर असल्याचे दिसून येत आह़े. ही गाडी आंबेरकर याने मे 2022 विकत घेतली होत़ी. गाडीच्या मागे आरआरपीसीएल कंपनीचे नाव लिहलेले असून, त्याखाली रिफायनरी समर्थक असे लिहलेले स्पष्टपणे दिसून येत आह़े. शशिकांत याने घटनेच्या दिवशी आंबेरकर याच्याशी संबंधित एक बातमी आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केली होत़ी. याचाच राग मनात ठेवून हा खून करण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला होत़ा.
जामीन अर्जावरील सुनावणीला ‘तारीख पे तारीख’
वारिशेच्या खूनातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने 1 मार्च रोजी जामीनासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होत़ा. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणावरून या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात येत असून ‘तारीख पे तारीख’ अशी अवस्था झाली आह़े. आता या जामीन अर्जावरील सुनावणी 28 मार्च रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े.








