प्रभागांची संख्या केली कमी : मतदारांच्या संख्येत असमानता
पणजी : सांखळी नगरपालिका प्रभाग पुनर्रचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले असून त्याची दखल घेऊन न्यायालयाने गोवा राज्य निवडणूक आयोग व इतर प्रतिवाद्यांना नोटीस जारी केल्या आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. सांखळी नगरपालिकेचे आधी 13 प्रभाग होते. ते आता पुनर्रचना करून 12 करण्यात आल्यामुळे इच्छूक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आयोगाने सांखळी पालिका प्रभागाची पुनर्रचना केली असून त्यावरूनच राजकारणास सुरवात झाली आहे. प्रभाग कमी करण्याच्या आयोगाच्या कृतीस आव्हान देण्यात आले आहे. आधी प्रत्येक प्रभागात 600 ते 700 मतदार होते आता प्रभार पुनर्रचना केल्यानंतर ती संध्या कमी अधिक विषम प्रमाणात करण्यात आली आहे.
मतदारांच्या संख्येत असमानता
पुनर्रचनेनंतर एका प्रभागात 400 ते 450 मतदार तर दुसऱ्या प्रभागात 800 ते 900 मतदार असे प्रमाण ठेवण्यात आले आहे. प्रभागातील मतदारांचे प्रमाण समान असायला हवे तर पुनर्रचनेच्या नावाखाली मतदारांचे प्रमाण समान न ठेवता विषम करून टाकल्याचे समोर आले आहे. एका प्रभागातील मतदारांची संख्या दुसऱ्या प्रभागातील मतदारांपेक्षा दुप्पट करण्य़ात आली आहे. त्यामुळे उमेदवार संतापले असून आयोगाला हाताशी धरून कोणीतरी हवी तशी प्रभाग पुनर्रचना केल्याचे आरोप होत आहेत. लोकसंख्या वाढत असतानाच मतदार वाढल्यामुळे प्रभाग संख्या जास्त व्हायला हवी होती, परंतु सांखळी प्रभाग पुनर्रचनेत ती संख्या कमी केल्यामुळे श्ंाका कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.









