पाहणीनंतर आमदार विजय सरदेसाई यांची माहिती
मडगाव : फातोर्डा मतदारसंघातील मुंगूल परिसरात पश्चिम बगलरस्त्याच्या स्टिल्ट पुलाचे काम सुरू असून येथे त्यासाठी उभारण्यात येथे असलेल्या खांब्यांमुळे पाणी अडून राहण्याची शक्यता असल्याने येथे अतिरिक्त साकव बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी आमदार सरदेसाई यांनी संबधित विभागाचे अभियंते तसेच अधिकाऱयांनी घेऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक फ्रान्सिस जोनास तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. सदर स्टिल्ट पूल पाणी साचून राहू नये या उद्देशाने उभारला जात आहे. कारण हा सखल भाग आहे. तरीही पूलासाठी उभारल्या जाणाऱया खांब्यांमुळे पाणी साचून राहण्याची भीती नगरसेवक आणि स्थानिकांनी व्यक्त केल्याने वरील तोडगा काढण्यात आल्याची माहिती आमदार सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर साकव उभारण्यासाठी संबंधित यंत्रणेचे अधिकारी राजी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ठिकाणाहून किनाऱयांकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावर अपघात घडण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्यास सरदेसाई यांनी अभियंत्यांना सूचित केले.









