पर्यटकांनी केली पाठ, व्यावसायिक धास्तावले
पणजी : पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांची होणारी धूप हा राज्यासाठी मोठा चिंतेचा विषय ठरला असून त्यातून पर्यटन उद्योगासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. त्यावर उपाय म्हणून किनारपट्टीवरील मातीची धूप तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करावा, अशी मागणी या उद्दोगाशी संबंधितांकडून होऊ लागली आहे. समुद्राची धूप हा पर्यटन उद्योगासाठी मोठा धोका ठरू शकतो या मतापर्यंत खुद्द पर्यटनंमत्रीसुद्धा आले असून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तर येत्या अधिवेशनात त्यासंबंधी खाजगी ठराव मांडून सदर आयोग स्थापन करण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. हा धोका टाळण्यासाठी नवीन संकल्पना सत्यात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. त्यासंबंधी प्रत्यक्ष उपाययोजना घेण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी आयोग स्थापन करावा व त्या आयोगाने भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) च्या अहवालाचाही अभ्यास करावा, ज्यात गोव्यातील दोन्ही जिल्हे भूस्खलनग्रस्त म्हणून नमूद करण्यात आले आहेत. दहा वर्षांत किनारपट्टींच्या झालेल्या धूपीमुळे गोव्याने सुमारे 15.2 हेक्टर जमीन गमावल्याचे इस्रो ने उघड केले आहे.
त्यावर श्री. खंवटे यांनीही किनारपट्टीची धूप रोखणे हे मोठे आव्हान असून पर्यटन उद्योगासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. आम्ही शॅक्स उभारण्यास परवानगी दिली असली तरी, किनारेच वाहून जात असल्याने खूप दूर अंतरावर उभारलेल्या शॅकमधून व्यवसाय होणे कठीण असते. त्यामुळे ही सागरी धूप कशी रोखावी याचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युरोपीय पर्यटकांना प्रचंड भूरळ घालणारा राजधानी पणजीपासून 10 किमी अंतरावर असलेला उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कोको बीच या समुद्री धूप चा बळी ठरला आहे. त्यामुळे पर्यटकांनी तेथे भेट देणे बंद केले आहे. त्यातून स्थानिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून संबंधितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. समुद्रकिनारे धूप होण्यापासून वाचवण्यासाठी पावले उचलली जात असून कोको बीचचे 394 मीटर लांबीचे काँक्रीट ब्लॉक्स रिव्हेटमेंट देऊन संरक्षण करण्याचा प्रस्ताव असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. दक्षिण गोव्यात बाणावली मतदारसंघालाही अशाच प्रकारे किनाऱ्यांची धूप होण्याचा मोठा फटका बसला आहे. या मतदारसंघात एकुण पाच समुद्रकिनारे असून त्यांची प्रचंड धूप होत आहे. बहुतांश किनारे ओस पडले आहेत. या किनाऱ्यांचीही जलस्रोतमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली होती.









