वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या विश्व मुष्टीयुद्ध फेडरेशनच्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन नितू घानगस तसेच स्वाती बोरा यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरीत गाठत भारताची पदके निश्चित केली आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेत निखत झरीन, जस्मीन यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
महिलांच्या 48 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 22 वर्षीय नितू घानगसने जपानच्या मेडोको वाडाचा पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकामध्ये स्थान मिळवले. नितूने उपांत्यपूर्व फेरीचा आपला सामना जिंकून भारताचे किमान कास्यपदक निश्चित केले आहे. महिलांच्या 81 किलो वजन गटात भारताच्या स्वाती बोराने बेलारुसच्या व्हिक्टोरिया केबीकेव्हाचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. बेलारुसच्या केबीकेव्हाने 2018 साली झालेल्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत कास्यपदक मिळवले होते. स्वाती बोरो आता महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियन स्पर्धेत आपले दुसरे पदक निश्चित मिळवणार आहे. यापूर्वी तिने 2014 साली या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. भारताच्या मनीषा मौन आणि साक्षी चौधरी यांचे मात्र आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.
चीनच्या वूने साक्षी चौधरीचा 52 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 5-0 असा फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच 57 किलो वजन गटात फ्रान्सच्या अमिना झिदानीने भारताच्या मनीषा मौनचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणत शेवटच्या चार स्पर्धकांत स्थान मिळवले. महिलांच्या 50 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या भारताच्या निखत झरीनने मेक्सिकोच्या पॅट्रीसिया अल्वारेझ हिरेराचा 5-0 असा एकतर्फी फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. या स्पर्धेतील निखतचा हा तिसरा विजय आहे. महिलांच्या 60 किलो वजन गटात भारताच्या जेसमिनने ताजिकस्तानच्या समाडोहावर मात करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. 63 किलो गटात जपानच्या मेई किटोने भारताच्या शशी चोप्राचा 4-0 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तर 66 किलो गटात उझ्बेकच्या खेमीडोहाने भारताच्या मंजूचा पराभव केला.









