कांचीपुरम / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील कांचीपुरम जिह्यात फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्यानंतर स्फोट झाला असून त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यातील कुऊविमलाई गावात फटाक्यांच्या कारखान्याला आग लागल्याचे कांचीपुरमचे जिल्हाधिकारी एम आरती यांनी सांगितले. 6 जणांच्या मृत्यूबरोबरच या घटनेत अनेक जण जखमीही झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून कांचीपुरम पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्फोट झालेल्या कारखान्यात किमान 25 जण काम करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, या कारखान्याकडे परवाना होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फटाके बनवल्यानंतर बाहेर उन्हात सुकविण्यासाठी ठेवल्याने त्यांना आग लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यानंतर आग इतकी झपाट्याने पसरली की कारखान्यात ठेवलेल्या फटाक्मयांनाही आग लागल्याने घटनेची तीव्रता वाढली. ही घटना उघडकीस आल्यानंतर तेथील स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या 25 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच त्यांनी गोदामात अडकलेल्या मजुरांची सुटका करून त्यांना कांचीपुरमच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.









