वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. आता त्यांना 5 एप्रिलपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे. ईडीची 5 दिवसांची कोठडी संपल्यानंतर बुधवारी सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. बुधवारच्या सुनावणीवेळी सिसोदिया यांनी तुऊंगात वाचण्यासाठी पुस्तकांची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मंजूर केली असून त्यांना पुस्तके पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या मद्य धोरण प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून सुरू आहे. ईडीने 9 मार्च रोजी तिहार तुऊंगातून सिसोदिया यांचा ताबा घेतला होता. त्यानंतरही 17 ते 22 मार्चपर्यंत ते ईडी रिमांडवर आहेत. आता 23 मार्चपासून त्यांचा ताबा सीबीआयकडे जाणार आहे.









