गोव्यातील जंगलांना पेटलेले वणवे नुकतेच कुठे शमलेले असताना आणखी एका आपत्तीने डोके वर काढले आहे. राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा सक्रीय झाला असून त्याच्या जोडीलाच सध्या देशभरात थैमान घालणाऱ्या एच3एन2 इन्फ्लुएन्झानेही शिरकाव केला आहे. तेव्हा साऱ्यांनीच आता सावध राहात आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज अधोरेखीत होत आहे.
गोव्यात मंगळवारच्या एकाच दिवशी 24 कोरोनाबाधीत आढळून आल्याने सक्रीय ऊग्णसंख्या सव्वाशेवर पोहोचली आहे. तर यात इन्फ्लुएन्झाचे दोन ऊग्ण आढळले आहेत. ऐन परीक्षेच्या दिवसात व पर्यटन हंगामाच्या तोंडावर कोरोना पुन्हा सक्रीय झाल्याने काळजी वाढली आहे. मुख्यमंत्री व आरोग्य खात्याने जनतेला सर्तकतेचे संकेत देताना, नवीन एसओपीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नवीन कोरोनाबाधीतांमध्ये बहुतेकजण युवा व तऊण वयोगटातील असल्याचे आकडेवारी सांगते. या संसर्ग फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्ययंत्रणा सतर्क झाली असून सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तुर्त परिस्थिती आटोक्यात असली तरी, नागरिकांनी कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे म्हणजेच एसओपीचे पालन करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणांनी दिला आहे. सर्दी खोकला व श्वसन त्रासाची लक्षणे दिसल्यास तात्काळ चाचणी करुन घ्यावी. खबरदारीचे उपाय म्हणून लोकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्कचा वापर सक्तीने करावा. वैयक्तीक स्वच्छता पाळावी व सुरक्षीत अंतर ठेवावे तसेच अहवाल सकारात्मक आल्यास विलगीकरणात राहण्याचा सल्लाही दिला आहे. कोरोनाबाधीतांचा आकडा आठवड्याभरात वाढत असला तरी सुदैवाने कोरोनाबळी नसल्याने सध्यातरी त्याची तीव्रता कमी असल्याचे दिसते पण खबरदारी घेणे तेवढेच गरजेचे आहे.
गेल्या आठ दिवसात कोरोना बाधितांचा आकडा ज्या गतीने वाढत आहे, ते पाहिल्यास भविष्यात चौथ्या लाटेचेही संकेत दिले जात आहेत. कोरोनाच्या जोडीलाच महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, तेलंगण या राज्यामध्ये झपाट्याने पसरत असलेल्या इन्फ्लुएन्जाचा गोव्यातही प्रसार झाल्याने या दुहेरी संकटला तोंड देण्याची प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. हे संक्रमण नवीन नसले तरी लोकांना गाफिल राहता येणार नाही. संसर्ग काळात कोणती काळजी घ्यायची असते, हे कोरोनाच्या तीन लाटानंतर लोकांना नव्याने सांगायची गरज उरलेली नाही. तरीही आरोग्य यंत्रणांना वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन दैनंदिन अहवाल जनतेपुढे ठेवावा लागेल.
तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेबद्दल सर्वांच्या मनात एकप्रकारची प्रचंड धास्ती होती. या अनामिक भितीपोटी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने काळजी घेतली. मात्र पहिली लाट ओसरताच दुसऱ्या लाटेत सगळेच गाफील राहिल्याने त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. पहिल्या लाटेची धास्ती अधिक असली तरी तिची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोरोनावर आपण मात केल्याच्या आविर्भावात असताना दुसऱ्या लाटेत हजारोंचे बळी घेऊन हा विषाणू शांत झाला. अधिकृत आकडेवारीनुसार एका गोवा राज्यात साधारण अडीच लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली व चार हजारहून अधिक लोकांचे या संसर्गाने बळी घेतला. या महामारीत ज्यांनी आपले प्रियजन व निकटवर्तीय गमावले, हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या मनावरील जखमा अजूनही ताज्या आहेत. कुठल्याही विषाणूची तीव्रता किती भयंकर असेल व तो कितपत घातक ठरेल याचा सर्वसामान्य अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनाही बांधता येत नाही. कोरोनाने हाच धडा दिला. कोरोनाचे प्रारुप नेहमीच चकवा देणारे व गाफील क्षणी घात करणारे असल्याने खबरदारी व सतर्कता हाच त्यावर उपाय आहे. कोरोना महामारीमुळे ज्यांचा अकाली मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांनी या संकटाचे घाव सोसले, तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या तडाख्यात नोकरी-व्यवसाय गमावलेल्या हजारो लोकांनी परिस्थितीचे चटके झेलले. त्यातून नुकताच कुठे गोवेकर सावरत आहे.
विस्कटलेली राज्याची आर्थिक घडी स्थिरस्थावर होऊ पाहत आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या गोव्यासारख्या राज्याला अशा आपत्तींचा नेहमीच सर्वाधिक धोका असतो. याची प्रचिती लॉकडाऊनच्या काळात गोवेकरांना पुरती आली आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने विषाणुजन्य संसर्ग फैलावताच त्याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तात्काळ परिणाम जाणवतात. मार्च ते मे हा सुट्टीचा काळ असल्याने या एक-दोन महिन्यात गोव्यात पर्यटकांचा ओघ सुऊ होतो. पावसाळ्यात ‘ऑफ सिझन’ असल्याने या तीन महिन्यातच राज्याच्या अर्थकारणाला बुस्टर मिळतो. तीन वर्षांपूर्वी कोरोनाची पहिली लाट नेमकी याच काळात धडकली. मार्चमध्येच पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने पर्यटन व्यवसायावर चिंतेचे ढग दाटू लागले आहेत.
कोरोना व इन्फ्लुएन्झासारखे संसर्ग आरोग्यासाठी घातक असले तरी रोजगार, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कला, संस्कृती या मानवी जीवनाचा वावर असलेल्या प्रत्येक क्षेत्रावर कमी-अधिक परिणाम करणारे ठरले आहेत. बंद शाळा व ऑनलाईन शिक्षण पद्धतीने दोन वर्षे शिक्षण व्यवस्थेला कसे वेठीस धरले हे सर्वांनी पाहिले. संक्रमण काळातील या अनिश्चित वातावरणात शिक्षण पूर्ण केलेल्या तऊणांना रोजगार मिळवताना किती खस्ता खाव्या लागल्या, याचा अंदाज बांधता येणार नाही. कोरोनाच्या तडाख्यात कोलमडलेले अनेक उद्योग अजूनही पुन्हा उभारी घेऊ शकले नाहीत. कला व सांस्कृतिक क्षेत्रावर उपजिवीका चालणाऱ्या कलाकारांच्या जगण्याची झालेली फरफट अशा सर्वच क्षेत्रातील घटकांवर त्याचा कमी अधिक परिणाम झाला. एका भीषण व कठीण पर्वातून सावरताना मागील सर्व विसऊन नव्या उमेदीने कोरोनोत्तर प्रवासाला नुकतीच कुठे सुऊवात झाली आहे. याने गोवेकरांची चिंता वाढली
आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस व तिसरा बुस्टर घेतल्यामुळे निर्धास्त राहता येणार नाही. कारण या विषाणुचा संपूर्ण बिमोड करणारी प्रतिबंधक औषधे अद्याप हाती लागलेली नाहीत. तोपर्यंत सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व वैयक्तिक स्वच्छता या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुनच संसर्गापासून स्वत:ला व इतरांना दूर ठेवता येईल. वैद्यकीय क्षेत्रात एक म्हण प्रचलित आहे ‘प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर’. कोरोनाबाबत सध्या तरी लोकांना हेच तत्व अंगिकारावे लागेल.
सदानंद सतरकर








