पिंपरी : पाणीपुरवठा विभागाच्या देखभालीच्या कामाची कार्यरंभ आदेशाची (वर्क ऑर्डर) फाईल तयार करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या अनुरेखकाला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेतले असून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप भावशिंग आडे (वय ५१) याला एसीबीच्या पथकाने मंगळवारी लाच घेताना रंगेहाथ पकडले. आडे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाणीपुरवठा विभागात अनुरेखक आहे. त्याच्याकडे लिपिकाची जबाबदारी आणि निविदा विभागातील कामकाज दिले होते. तर, ३४ वर्षीय तक्रारदार महापालिका पाणीपुरवठा विभागाची देखभाल दुरुस्तीची कामे करतात. त्यांना शासकीय निविदेनुसार काम मिळाले होते.
या कामाच्या कार्यरंभ आदेशाची फाईल तयार करुन संबंधित विभागाकडे पाठविण्यासाठीचा मोबादला म्हणून आडे याने एक लाख पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते. एक लाख रुपयांची लाच मंगळवारी आडे याला महापालिका मुख्यालयात दिली. त्यानुसार लाच स्वीकारताना आडे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेतले असून, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : राज्यात तुरळक पावसाचा अंदाज








