हार, फुले, मेस काठी, साखरमाळा, कडुनिंब आदी साहित्यासह आंबोत्यांना मागणी
बेळगाव : बुधवारी होणाऱ्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. विशेषत: हार, फुले, फळे, कडूनिंब, आंब्याची पाने यासह पूजा साहित्याला मागणी वाढली होती. गुढी उभारण्यासाठी मेस काठ्या, कलश, साखरेच्या माळा, फुलांच्या माळा आदी साहित्याच्या खरेदीसाठी लगबग पाहायला मिळाली. दोन वर्षात कोरोनामुळे गुढीपाडवा निर्बंधाखाली साजरा झाला होता. यंदा गुढीपाडवा उत्साहात साजरा होणार आहे. त्यासाठी विविध साहित्याच्या खरेदीला उधाण आले आहे. बाजारात सफरचंद, द्राक्षे, पेरू, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी यासह विड्याच्या पानांची मागणी वाढली होती. विशेषत: दुर्वा, फुले, हार, कडूनिंब आणि आंब्याच्या डहाळ्यांना मागणी वाढली होती. मंगळवार असला तरी बाजारपेठ नागरिकांनी फुलली होती. सकाळपासून गुढीपाडव्याचे साहित्य खरेदीसाठी आबालवृद्धांची रेलचेल पाहायला मिळाली.
शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, मेणसी गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी पूजा साहित्य आणि इतर वस्तुंच्या खरेदीची रेलचेल दिसत होती. विशेषत: बुरुड गल्लीत गुढी पाडव्यासाठी लागणाऱ्या मेस काठ्यांची खरेदी झाली. 100 ते 150 रुपये एकप्रमाणे बांबूची काठी विक्री होत होती. त्याबरोबरच पंचांग, साखरगाठी, रेशीम वस्त्र, कडूनिंबाची पाने, तांबा, पितळ, रांगोळी, पताका आदींची खरेदीही वाढली होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. पांगुळ गल्ली व मेणसी गल्लीत भगव्या पताका आणि झेंड्यांची विक्री अधिक झाली. लहान झेंड्यांपासून मोठे झेंडे नागरिकांनी खरेदी केले. पाडव्याला पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते. दरम्यान, काहीजण लहान झेंडे उभारून पूजा करतात. त्यामुळे झेंड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.
सोने-चांदी, नवीन वाहनांची खरेदी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बाजारपेठेत सोने-चांदीची खरेदी वाढणार आहे. त्याबरोबरच नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि नवीन वाहनेही खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे बुधवारी बाजारपेठेत मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. यासाठी शहरातील शोरुम्स गृहोपयोगी साहित्यांनी सज्ज झाली आहेत.









