अबकारी पोलिसांची कारवाई : एकाला अटक
बेळगाव : महाराष्ट्र व गोव्यामधून कर्नाटकात वाहतूक होणारी गोवा बनावटीची दारू बाची चेकपोस्टजवळ जप्त करण्यात आली आहे. तब्बल 7 लाख 22 हजार 400 रुपयांची दारू व वाहन पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी रोहित नागेश कोवाडकर (वय 27, रा. ज्योतीनगर, कंग्राळी के. एच.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक केए 22 डी 6275 मधून 86 बॉक्स दारूसाठा आणला जात होता. बेकायदेशीररित्या ही दारू आणण्यात येत होती. बाची गावाजवळ चेकपोस्ट नाका उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये दारूसाठा आढळला आहे. 7 लाख 22 हजार 400 रुपयांचा दारूसाठा व 10 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 17 लाख 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी खात्याचे निरीक्षक मंजुनाथ गलगली, प्रवीण बेळकोड यांनी ही कारवाई केली आहे.









