दूषित पाण्याचा धोका, विहिरीचे पाणी शक्यतो टाळण्याचे तज्ञांचे नागरिकांना आवाहन
बेळगाव : तुम्ही कोणते पाणी पिताय? सावध व्हा…. पाणी विहिरीचे आहे का नळाचे आहे? हे प्रथम तपासून घ्या. विहिरीचे पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा. शहरातील बहुसंख्य विहिरींच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. हे दूषित पाणी उलट्या, जुलाब, अतिसार यांना कारणीभूत ठरत असून विहिरींचे पाणी पिणे शक्यतो टाळा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. शहरातील बहुसंख्य ठिकाणी प्रामुख्याने टिळकवाडी परिसरात विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. या पाण्याला कधी वास येतो कधी नाही. परंतु हे पाणी पिल्यामुळे पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिसाराचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे विहिरींचे पाणी पिण्यासाठी धोकादायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमध्ये पाण्याची शुद्धता तपासणारी प्रयोगशाळा अलिकडेच सुरू झाली आहे. या प्रयोगशाळेत साधारण या महिन्यात 25 ते 30 हून अधिक जणांनी विहिरीच्या पाण्याचे नमुने आणून तापासून घेतले आहेत. त्यामध्ये हे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असा अहवाल प्रयोगशाळेच्या चालकांनी दिला आहे. साधारण स्मार्ट सिटीचे काम सुरू झाल्यापासून ठिकठिकाणी जलवाहिन्यांना आणि ड्रेनेज पाईपलाईन फुटून पाणी प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच उन्हाळ्यात पाणीटंचाई सुरू झालेली आहे. अशावेळी लोकांना विहिरीचे पाणी वापरणे भाग पडते. परंतु हेच पाणी सध्या दूषित झालेले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पाण्यामध्ये बॅक्टेरियाच्या प्रमाणात वाढ

पाण्याची चाचणी करणाऱ्या प्रा. सुशांत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पाण्यामध्ये ई कोलाय म्हणजे बॅक्टेरियांचे प्रमाण वाढलेले आहे. आयएसआयच्या मानांकनानुसार जर पाण्यात बॅक्टेरिया असतील तर ते पाणी पिण्यासाठी योग्य नाही. विहिरीजवळूनच गटर वाहत असेल, ड्रेनेज पाईपलाईन असेल तर विहिरींचे पाणी प्रदूषित होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचे शुद्धीकरण केले तरीसुद्धा ते पिण्यासाठी 100 टक्के शुद्ध आहे याची खात्री देता येत नाही. मात्र, महानगरपालिका ज्या पाण्याचा पुरवठा करते ते पाणी पूर्णत: शुद्ध आहे. ते पिण्यासाठी योग्य आहे. विहिरीचे प्रदूषित पाणी उकळून प्याल्यास चालेल का? असा प्रश्न सतत विचारला जातो. परंतु शक्यतो ते पाणीसुद्धा पिण्यायोग्य नसते. त्यामुळे एकूणच प्रदूषित विहिरींचे पाणी पिण्याचे टाळणे हितावह होय. तसेच टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरत असाल तर तेसुद्धा उकळून प्या, असे ते म्हणाले.
: प्रा. सुशांत जिगन मायक्रोबायोलॉजिस्ट-जीएसएस कॉलेज









