गुढीपाडव्यानिमित्त मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन : संस्था-मंडळांकडूनही प्रवचन : रामनाम जप यज्ञ-तीर्थप्रसाद
बेळगाव : हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा शुभारंभ गुढीपाडव्यापासून म्हणजेच बुधवार दि. 22 मार्चपासून होणार आहे. यानिमित्त शहरातील विविध मंदिरांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गौड सारस्वत समाज शहापूर
गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर बेळगावतर्फे बुधवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 8 वाजता समाजाचे खजिनदार विकास कब्बे यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर गुढीपूजन व ध्वजपूजन करून पंचांग वाचनाने कार्यक्रमाची सांगता होईल. सदर कार्यक्रम समादेवी गल्लीतील श्री हरिमंदिर येथे होणार आहे. समाजबांधव व भक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळ, वडगाव
वडगाव येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सेवा मंडळाच्यावतीने यंदाही पाडव्यापासून श्री ज्ञानेश्वर मंदिर, राजवाडा कंपाऊंड, वडगाव येथे कोटी रामनाम जप यज्ञ सुरू होणार आहे. दि. 22 ते 28 मार्चदरम्यान हा जपयज्ञ अखंड चालणार आहे. यानिमित्त पहाटे 5 ते 6.30 काकडारती, 6.30 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 सामुदायिक रामनाम जप, सायंकाळी 7 ते 8 प्रवचन सेवा होणार आहे. हभप संतोष कुष्टे महाराज यांचे दररोज प्रवचन होणार असून भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जीवनविद्या मिशन
सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र बेळगाव यांच्यावतीने गुढीपाडव्याचे औचित्य साधून लोकमान्य श्रीराम मंदिर आचार्य गल्ली गाडेमार्ग शहापूर येथे युवा प्रवचनकार मृणाल खणगावकर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम बुधवार दि. 22 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होईल. यावेळी उपासना यज्ञ, संगीत जीवनविद्या व प्रवचन होणार असून हा कार्यक्रम विनामूल्य आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे कळविले आहे.
कलखांबला मल्हारलिंग देवाची यात्रा
कलखांब गावातील ग्रामस्थांचे व अनेक भक्तांचे कुलदैवत श्री मल्हारलिंग देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 22 रोजी आंबील गाडे व मिरवणूक तसेच 23 रोजी सकाळी 9 वाजता ऊद्राभिषेक, 11 वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मल्हारलिंग पंच कमिटीने केले आहे.









