22 वर्षानंतर सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये खर्चुन दुरूस्तीकाम
फोंडा : फोंडा पालीकेची सार्वजनिक स्मशानभुमी ‘मुक्तीधाम’चे दुरूस्ती व नुतनीकरण कामाचा शुभारंभ काल रविवारी पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. चौदाव्या वित्त आयोगाच्या फंडातून सुमारे 1 कोटी 20 लाख रूपये खर्चुन हे काम हाती घेण्यात येत आहे. येत्या सात महिन्यात हे काम पुर्ण झाल्यानंतर स्मशानभूमीत येणाऱ्या लोकांसाठी चांगल्या सुविधा मिळणार आहे. यावेळी पालीकेचे मुख्याधिकारी सोहन उस्कईकर, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, नगरसेवक प्रदीप नाईक, विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, चंद्रकला नाईक, शांताराम कोलवेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष रितेश नाईक म्हणाले फोंडा तालुक्यात वारखंडे येथील मुक्तीधाम ही एकमेव सार्वजनिक स्मशानभूमी आहे. सर्व धर्मियांसाठी अंत्यसंस्कार करण्यात येतात. 22 वर्षापुर्वी उभारण्यात आलेली स्मशानभूमीची इमारत जीर्ण अवस्थेत होती, पावसाळयात आतील भागात गळती लागलेली असल्याने अंतिमसंस्कारासाठी भेट देणाऱ्यांची तारांबाळ उडत असे त्यामुळे प्राधान्यक्रमाने हे काम हाती घेण्यात आल्याचे सांगितले. पालीका मंडळाचा कार्यकाळ येत्या महिन्याभरात संपुष्टात येत आहे. पुढील निवडणूकीना सामोरे जाताना आपल्या कार्यकाळात महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.तसेच मार्केट प्रकल्पातील दुकानांचा येत्या दिवसात लिलाव करण्यात येईल. पालीका बाजार, गोल्डन ज्युबिली प्रकल्पाना चालना मिळणार आहे.
मुक्तीधामाची सुमारे 1 कोटी 20 लाख खर्चून दुरूस्ती
22 वर्षापुवी उभारण्यात आलेल्या मुक्तीधाम स्मशानभूमीच्या दुरूस्तीकामात विद्यमान मुख्य इमारतीचे छत नवीन पत्र्यानी झाकणे, खडप्पा आणि कोट्टाचे फ्लोअरिंग, लाकुड साठविण्यासाठी व कापण्यासाठी शेड, येथे भेट देणाऱ्यासाठी बसण्याची जागा, आतील परिसराचे हॉटमिक्स डांबरीकरण, कार स्कुटर पार्किग जागेवर पेव्हर्स, सद्या मृतदेह जाळण्यासाठी असलेल्या सहा स्टॅन्डची डागडुजी, शौचालयाची दुरूस्ती, मुख्य इमारतीचा जिर्णोद्धार, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, प्रवेशद्वाराला नवीन गेट बसविण्याचा कामाचा समावेश आहे. नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याहस्ते दुरूस्तीकामाच्या नामफलकाचे अनावरण करून श्रीफळ वाढवून नुतनीकरण कामाला प्रारंभ करण्यात आला.









