राजहंसगडावर मराठी अस्मितेचे दर्शन : दुग्धाभिषेक सोहळ्याला हजारोंची उपस्थिती

बेळगाव : स्वाभिमानी मराठी भाषिकांनी राजहंसगड येथे पुन्हा एकदा मराठी अस्मिता दाखवून दिली. कोणत्याही राजकीय वरदहस्ताविना लोकवर्गणीतून दुग्धाभिषेक सोहळा करण्यात आला. रणरणत्या उन्हातही शिवभक्तांचा अमाप उत्साह दुणावला. ढोल ताशाच्या गजरात व मंगलवाद्यांच्या सुरात शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा अशा भगवेमय वातावरणात हा अभुतपूर्व सोहळा पार पडला. राजहंसगड येथे उभारण्यात आलेल्या सर्वात उंच शिवमूर्तीच्या उद्घाटनाला राजकीय किनार लागली. यामुळे शिवरायांचा हा अवमान असून, मराठी भाषिकांनी दुग्धाभिषेक करावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सोहळा आयोजित करण्यात आला. बेळगाव शहरासह तालुक्यातील हजारो शिवभक्तांनी उपस्थित रहात सोहळा यशस्वी केला. यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला पुन्हा एकदा बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. राजहंसगडाच्या पायथ्यापासून पालखी मिरवणुकीला सुरूवात झाली. शहापूर येथील संघर्ष ढोल-ताशा पथकाच्या वादकांनी अप्रतिम असे ढोलताशा वादन केले. पायथ्यापासून राजहंस गडावरील शिवमूर्तीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. सनई चौघड्यांच्या मंगल वाद्यांमध्ये दुग्धाभिषेक सोहळा पार पडला. विविध गावच्या वारकरी भजनी मंडळाने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.

शिवभक्तांचा उत्साह
रणरणत्या उन्हामध्येही शिवभक्तांचा उत्साह मात्र अमाप होता. भर उन्हामध्ये पायथ्यापासून राजहंस गडापर्यंत मिरवणुकीमध्ये शेकडेंची उपस्थिती होती. तालुक्यातील विविध गावच्या महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. दुपारी 2 पर्यंत रणरणत्या उन्हामध्येही शिवभक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. दुग्धाभिषेक सोहळ्यासोबत महाप्रसादही उन्हात घेऊन मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखविली. मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. अॅड. महेश बिर्जे, मनोहर किणेकर, रामचंद्र मोदगेकर, शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, अॅड. सुधीर चव्हाण, आप्पासाहेब गुरव, अॅड. एम. जी. पाटील, दत्ता उघाडे यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला. दुपारनंतर हिंडलगा येथील शाहीर वेंकटेश देवगेकर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. आपल्या पहाडी आवाजाने सळसळते शिवचरित्र सादर करून शिवभक्तांची मने जिंकली. रायगड येथील पुरोहितांच्या हस्ते शिवमूर्तीचे विधिवत पुजन करण्यात आले. बेळगाव, खानापूरमधुन हजारो भाविक दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होते. पिरनवाडी येथील तऊणांनी शिवभक्तांना आंबिलचे वाटप केले.

स्वाभिमान गहाण टाकणार नाही
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. मतदारांना नारळ, लिंबूवर हात ठेवून मतदान करून अशी शपथ दिली जात आहे. परंतु मराठी भाषिकांना असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नाही. त्यामुळे स्वाभिमान गहाण टाकणार नाही, गद्दारी करणार नाही, म. ए. समितीच्या ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहिण अशी शपथ माजी आमदार मनोहर किणेकर यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली. राजहंस गडावरील दुग्धाभिषेकाचा सोहळा होवू नये यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तहसीलदारांसमोर आपली भूमिका जाहीर केली. त्यामुळे कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला. तरी देखील रविवारी सकाळी बेळगावच्या तहसीलदारांनी राजहंसगड येथे भेट देवून संपूर्ण सोहळ्याची पाहणी केली. याचबरोबर राजहंसगड परिसरात पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाप्रसादाचे नेटके नियोजन
दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. स्वाभिमानी जनतेच्या रकमेतून महाप्रसाद करण्यात आला. उद्योजक, व्यापारी, शिवभक्त, मराठी भाषिक यांच्या देणगीतून महाप्रसादाचे साहित्य घेण्यात आले. राजहंसगडाच्या पायथ्याशी शनिवारी रात्रीपासून महाप्रसादाची जय्यत तयारी करण्यात आली. येळ्ळूर विभाग समितीच्या नेतृत्वाखाली महाप्रसाद तयार करण्यासोबतच वितरण करण्यात आले. अंदाजे 15 हजार शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









