बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी सांगली येथून धर्मवीर ज्वाला रविवारी सकाळी बेळगावमध्ये आणली. धर्मवीर संभाजी चौक येथे धर्मवीर ज्वालेचे विधिवत पूजन करण्यात आले. सायंकाळी शिवाजी उद्यान येथे बेळगाव, गोवा व सिंधुदुर्ग येथील धारकऱ्यांनी ज्वाला नेण्यासाठी गर्दी केली होती. प्रत्येक गावागावात धर्मवीर ज्वाला प्रज्वलित करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे या उद्देशाने महिनाभर बलिदान मास आचरणात आणला जातो. 21 फेब्रुवारीपासून बलिदान मासचे पालन केले जात आहे. या निमित्त सांगली येथील वढु बुद्रूक येथून धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी शनिवारी धारकरी रवाना झाले. हे धारकरी रविवारी सकाळी बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर संभाजी चौक येथे विधिवत पूजन झाले. जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते धर्मवीर ज्वालेचे पूजन करण्यात आले.
उद्या मूक पदयात्रा
बलिदान मासच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. 21 मार्च रोजी मूक पदयात्रा काढली जाणार आहे. शिवाजी उद्यानपासून संभाजी चौकपर्यंत मूक पदयात्रा काढून ज्वाला शांत करण्यात येणार आहे. मंगळवारी पहाटे 6.30 वा. शिवाजी उद्यान येथे धारकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. रविवारी सायंकाळी शिवाजी उद्यान येथे प्रत्येक गावचे धारकरी उपस्थित होते. धारकरी धर्मवीर ज्वाला प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन गेले. धर्मवीर ज्वाला घेऊन तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 25 कार्यकर्ते बेळगावमध्ये दाखल झाले. स्वागतावेळी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका प्रमुख परशराम कोकितकर, अनंत चौगुले, किरण बडवाण्णाचे, अमोल केसरकर, विनायक कोकितकर, बाळू सांगूकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









