ही कथा ओडीशातील एका सामोसा दुकानदाराची आहे. 22 वर्षांपूर्वी त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. त्यामुळे शिक्षण घेणे अशक्य होते. म्हणून त्याने रोजगाराचे एक साधन म्हणून सामोसा तयार करण्याचे दुकान घातले. त्यावेळीं एका सामोशाची किंमत होती 1 रुपया. या धंद्यात त्याचा जम बसला. त्यामुळे त्याची आर्थिक चणचण दूर झाली. तेव्हापासून त्याने त्यातच पूणंतः लक्ष घातले आणि सामोशाच्या व्यवसाय भरभराटीला आणला आहे.
आता या घटनेत आश्चर्य असे काय असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. कारण असे व्यवसाय अनेकांनी सुरु केले आहेत आणि चांगले जमही बसलेला आहे. मात्र, हे दुकान चालविणाऱया या अरुण नामक व्यावसायिकाने एकदाही आपल्या सामोशाची किंमत वाढविलेली नाही. 22 वर्षांपूर्वी जो एक रुपया दर होता, अक्षरशः तोच आजही आहे. आज कोणत्याही दुकानात सामोसा 10 रुपयांच्या खाली मिळणे अशक्य मानले जाते. पण येथे मात्र तो 1 रुपयालाच मिळतो. हे कसे शक्य होते हेही तो सांगतो. महागाईच्या दिवसात तो स्वस्त सामोसा विकत असल्याने त्याच्या ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे त्याला नफा कमी मिळत असला तरी सामोसे जास्त खपत असल्याने एकंदर धंदा नफ्यात आहे असे त्याचे म्हणणे आहे. केवळ त्याने महागाईशी जुळवून घेण्यासाठी सामोशाचा आकार कमी केला आहे. तरीही त्याच्या अर्थशास्त्राचे आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. आजही ते मोठे गूढच आहे.









