जिल्हाप्रशासनासमोर मांडल्या तरुणांच्या भावना
कोल्हापूर प्रतिनिधी
जुन्या पेन्शन विरोधात दसरा चौकातून काढण्यात येणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या मोर्चाला ऐनवेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ( Raghunathdada Patil ) यांचा आधार मिळाला. मोर्चाला नेतृत्वाचा चेहरा नसल्याने मोर्चा बारगळणार अशी स्थिती असतानाच रघुनाथदादांनी मोर्चाचे नेतृत्त्व करत उपस्थित तरुणांना पाठबळ दिले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली सुशिक्षित बेरोजगार तरुण, विद्यार्थी यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासमोर निवेदनातून भावना मांडल्या.
सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पुकारलेल्या संपाविरोधात शुक्रवारी कोल्हापुरात सुशिक्षित बेरोजगारांनी मोर्चाचे आयोजन केले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मॅसेज पाहून तरुण दसरा चौकात जमत होते. मात्र मोर्चाला चेहरा नसल्याने मोर्चाचे नेतृत्त्व करायचे कोणी, असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे उपस्थित तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मोर्चा निघणार अशी समज झाल्याने तरुण निघून जात असतानाच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा मोर्चा स्थळी उपस्थित झाले. मोर्चाला नेतृत्त्व नाही हे समजल्यावर त्यांनी मी करतो मोर्चाचे नेतृत्त्व असे म्हणत उपस्थित तरुणांना आधार दिला. यानंतर तरुणांनी दसरा चौक येथे प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शासकीय कार्यालये, रुग्णालयांमधील सेवा जनतेला मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती यांची परिस्थिती जिकरीची बनली आहे. अनेकांना दररोज शंभर रुपयांचाही रोजगार मिळणे मुश्किल झाले आहे. मात्र ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार आहेत. तेच कर्मचारी पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत, हे अत्यंत अयोग्य आहे. सरकारने जर अशा पेन्शन योजनेस मंजुरी दिली तर राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. त्यामुळे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी मंजूर करु नये, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी डॉ. शंकर बावडेकर, डॉ. नामदेव निहुरकर, बाळ नाईक, रणजीत भास्कर, पुंडलिक बिरांजे, तातोबा हंडे, गौरव लांडगे, अनिश पाटील, अभिषेक साने, शिवाजी कापसे, विश्वजीत पाटील, अनिकेत पाटील, गणेश हजारे आदी उपस्थित होते.
‘केस’च्या भीतीने तरुणांची माघार
दरम्यान मोर्चासाठी आलेले तरुण, विद्यार्थी यांना मोर्चास परवानगी घेतली नसल्याने मोर्चा काढल्यास केस केली जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे केस होण्याच्या भीतीने काही तरुणांनी मोर्चामधून काढता पाया घेतला.
जीएसटी भरणारे नागरिक देश चालवितात : रघुनाथदादा पाटील
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींच्या मोर्चाचे ऐनवेळी नेतृत्व करणारे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले, आपल्या देशात एकूण महसुलापैकी तब्बल 65 टक्के महसूलातून मिळणारा निधी लोकसंख्येत 8 टक्के असणाऱ्या सरकारीबाबू आणि राजकीय नेत्यांवर खर्च होत आहे. या उलट 92 टक्के जनतेवर केवळ 35 टक्के निधी खर्च केला जातो. सरकारीबाबूंचे पगार आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचारी असोत वा पाच दहा हजार रूपयांवर राबणारे युवक, युवती असोत यांच्यातील कमाल आणि किमान वेतनात लाखेंचा फरक आहे. युवकांना नोकऱ्या नसल्याने बेकारी वाढत आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. शिक्षावाले, टॅक्सीवाले, हमाल यांच्यासह असंघटित क्षेत्रातील प्रत्येकांत असंतोष आहे. जीवन जगण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहेत. अशावेळी लाखोंचा पगार घेणारे, सर्व सोयी सुविधा मिळणारे शासकीय कर्मचारी आता निवृत्तीनंतर जुन्या पेन्शनसाठी संप करत आहेत. त्यांच्या विरोधात बेरोजगार तरुणांचा मोर्चा योग्यच होता. म्हणून त्या मोर्चाचे नेतृत्व केले. इन्कमटॅक्स भरणारे नव्हे तर जीएसटी भरणारे असंघटित क्षेत्रातील लोक देश चालवितात, याचे भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.