कोल्हापूर प्रतिनिधी
बहुजन उद्धारक, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि राजर्षी शाहू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेचे बुधवारी उद्घाटन झाले. मानव्यशास्त्र विभागाच्या सभागृहात डॉ. भालचंद्र मुणगेकर, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. तारा भवाळकर यांनी शाहूंच्या विचारांतील विविध पैलू उलघडवून दाखवित त्यांच्या कार्याची महती सांगितली. उद्घाटन प्रसंगी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराजांमुळेच महाराष्ट्रात लोककल्याणकारी राज्याची स्थापना : डॉ. भालचंद्र मुणगेकर
महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्रस्थापना करणारे राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. ‘राजर्षी शाहूंचे अर्थकारण आणि त्याची विद्यमान प्रासंगिकता‘ या विषयाच्या अनुषंगाने बीजभाषण करताना डॉ. मुणगेकर म्हणाले, शाहू महाराजांनी सर्व समाजघटकांचा साकल्याने विचार केला. सामाजिक समावेशनाची प्रक्रिया जेव्हा चर्चाविश्वातही नव्हती, त्या काळात वंचित, शोषित घटकांच्या समावेशी वृद्धीचा त्यांनी कृतीशील विचार केला. मिळकतीच्या स्रोतांचे व्यवस्थापन आणि प्राप्त मिळकतीचे समान आणि एकाच वेळी वाटप, याचा विचार म्हणजे राजकीय अर्थकारण. झिरपणीच्या सिद्धांतास शाहू महाराज नक्कीच अनुकूल नव्हते. त्यांनी राजकीय अर्थकारणाच्या आधारेच लोककल्याणाची अनेकविध कामे मार्गी लावली. त्यातून शेतकरी, कष्टकरी, शोषित, वंचित, दलित अशा समग्र घटकांना सामाजिक न्याय प्रदान केला. भांडवलशाहीतील आर्थिक केंद्रीकरणाला विरोध करणारे त्या काळातील देशामधील एकमेव संस्थानिक म्हणजे शाहू महाराज होते. त्यांचा भर विकेंद्रीकरणावर होता. अवघ्या नऊ लाख लोकसंख्येच्या संस्थानामध्ये भांडवलशाहीला त्यांनी विरोध केलाच, पण सर्व प्रकारच्या मर्यादा तोडून महाराजांनी त्यांचे कार्य उभारले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अवनीश पाटील यांनी आभार मानले.
शाहू महाराजांच्या जडणघडणीत गुरू प्रेझर यांचा मोलाचा वाटा : डॉ. यशवंत थोरात
राजर्षी शाहू महाराजांच्या जडणघडणीत त्यांचे गुरू सर स्टुअर्ट फ्रेझर यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ व विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे व्यक्त केले. ‘राजर्षी शाहू आणि युरोपियन विचारविश्व‘ या विषयावर डॉ. थोरात बोलत होते. ते म्हणाले, वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये रुजू झालेल्या फ्रेझर यांच्यावर राजकुमारांच्या ट्युटरशीपची जबाबदारी सोपविण्यात आली. एकीकडे युरोपातील मुक्त विचारांचे वारे तर दुसरीकडे वसाहतवादी भूमिकेतून भारतामध्ये करावयाचा वावर अशा दुहेरी भूमिकेतून फ्रेझर यांच्यासह आयसीएसमधील सर्वच अधिकाऱ्यांना काम करावे लागत असे. फ्रेझर यांनी तेरा वर्षांमध्ये अवघ्या तीन राजकुमारांना शिकविले. त्यामध्ये शाहू महाराजांसह भावनगरचे भावसिंगजी महाराज आणि म्हैसूरचे कृष्णराज वाडियार यांचा समावेश होता.
या तिन्ही राजकुमारांनी आपल्या संस्थानात सर्व क्षेत्रात केलेले कार्य आजच्या राजकर्त्यांना प्रेरणा देणारी आहेत. यावेळी डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व आभार मानले.
राजर्षी शाहूंच्या कृतिशिलतेमुळे महिलांना न्याय : डॉ. तारा भवाळकर
महात्मा जोतिबा फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी वैचारिक मशागत केली, पण राजर्षी शाहूराजांनी यात आपल्या दृरदृष्टीतून कृतिशील भर घातली. त्यांनी केलेले सक्तीचे प्राथमिक शिक्षण, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदेच हिंदू कोड बिलातून पुढे आले. याशिवाय 86 वर्षांनंतर सरकारने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करून राजर्षी शाहूराजांच्या कृतिशीलतेचा गौरवच केला आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, डॉ. तारा भवाळकर यांनी केले.
डॉ. तारा भवाळकर यांनी ‘राजर्षी शाहू आणि त्यांची स्त्राrविषयक भविष्यवेधी दृष्टी’ यावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार होते. तसेच डॉ. भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. भवाळकर म्हणाल्या, राजर्षी शाहूराजांकडे माणसाला समर्थ करण्याची दूरदृष्टी होती. त्यामुळेच ते शिक्षणाचे आधारवड ठरतात. राजर्षी शाहू दत्तक आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील चार महिलांमध्ये त्यांची वैचारिक जडणघडण झाली. त्यातूनच त्यांची स्त्रीविषयक भविष्यवेधी दृष्टी तयार झाली. त्यांनी संस्थानात सक्तीचे शिक्षण राबवले. विविध जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा काढल्या, वसतीगृहे काढली, अन् जातीनिर्मूलनासाठी पावले उचलली. अगदी मिश्र विवाहाचे पाऊल टाकत जातीभेद तोडण्याचे काम केले. त्यांच्या कृतिशिलतेतून माणूस आतून आमुलाग्र बदलण्यासाठी कायदे आणि प्रबोधन यांची एकत्रित सांगड दिसून आली. त्यामुळेच राजर्षी शाहू महाराज हे बहुस्पर्शीत्व व्यक्तिमत्व ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
आज परिषदेची सांगता
गुरूवारी, 16 रोजी सकाळी साडेअकरा वाजता राजर्षी शाहू आणि महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा यावर डॉ. सदानंद मोरे यांचे तर राजर्षी शाहू आणि सामाजिक न्याय यावर प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 3 वाजता निवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे ‘राजर्षी शाहू आणि भारतीय संविधान’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू संशोधन केंद्राचे संचालक जयसिंगराव पवार आहेत. या कार्यक्रमाने परिषेदेची सांगता होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









